मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतची नवी गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात झाली. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग सुरु आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आजही मार्केट आणि रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सरकारकडून कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे काही निर्बंध कडक करावे लागतील. विरोधीपक्ष म्हणून तुम्ही सहकार्य करा, असं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर आवश्यक त्या उपाययोजनांना आम्ही सहकार्य करु. आम्हाला कोरोनाबाबत राजकारणापेक्षा जनतेचे हित कायम महत्वाचे राहिले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. भाजपा सरकारच्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे, यावर मी बोलणार नाही. मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखही उपस्थित होते.
बैठकीत संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही. सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पुण्यात आधीच मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown in Pune) सुरु झाला आहे. तसाच मुंबईतही सुरु करून उर्वरित राज्यात अन्य नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या कोरोना विस्फोट झालेल्या जिल्ह्यांसाठी वेगळे नियम आणि जिल्हावार वेगळे निर्बंध असण्याची शक्यता आहे. सत्ताधारी मित्रपक्षांसह विरोधी पक्षांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. काही पक्षांनी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरा पण कोरोना निर्मुलनासाठी असे आवाहन केले आहे.
राज्याला कोरोनाचा विळखा-
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. शनिवारी कोरोनाच्या ४९ हजार ४४७ रुग्ण आणि २७७ मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, राज्यात शुक्रवारी ४७ हजार रुग्णांची नोंद झाली होती. परिणामी, राज्य शासनासमोर कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे.
सध्या राज्यात ४ लाख १ हजार १७२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के झाले असून मृत्युदर १.८८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३ लाख ४३ हजार १२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.५२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ५७ हजार १३५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.