Join us

"संपूर्ण मुंबई आपल्याला स्वच्छ करायची आहे", मुख्यमंत्र्यांकडून पालिकेच्या उपाययोजनांची पाहणी 

By मनोहर कुंभेजकर | Published: November 21, 2023 9:44 AM

आज भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्यात काही बदलही सुचवले.

मुंबई : मुंबईतील स्वच्छता आणि वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी भेटी देवून पाहणी केली. आज भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्यात काही बदलही सुचवले.

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी रस्ते धूवून काढण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला सचणारी धूळ आणि माती काढण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहने आणि फॉग मशिन्स यांचीही पाहणी केली. तसेच ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही उपयुक्त सूचना देखील केल्या. 

या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली असली तरीही संपूर्ण मुंबई आपल्याला स्वच्छ करायची असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही यावेळी जाणून घेतली. तसेच त्यांना या कामाचे महत्व पटवून देतानाच त्यांच्यासह चहा घेतला. 

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसेच मुंबई महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगार यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईमुंबई महानगरपालिका