'आपल्याला आता संघर्ष करावाच लागेल'; चंद्रकांत पाटलांचं ओबीसींच्या बैठकीत मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 07:01 PM2022-05-07T19:01:34+5:302022-05-07T19:01:55+5:30
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई- राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत. यामुळे येत्या काही दिवसातच निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. यानंतर मात्र राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोर्टाने लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट करण्यास सरकारला सांगितलं होतं. मात्र त्यांनी कानाडोळा केला. मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्याचा सरकारने प्रयत्न केला नाही. तसचं आता ओबीसी आरक्षणाबाबतही झालं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईतील वसंत स्मृती सभागृहात आज भाजपाच्या ओबीसी मोर्चातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात ओबीसींच राजकीय आरक्षण नसेल, तर मग महापौर, पंचायत, नगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व कसं मिळेल?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच पाच वर्ष आरक्षण नसेल, त्यामुळे आपण शांत बसणार नाही. आपल्याला गावोगावी जाऊन संघर्ष करावा लागेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केलं.
भाजपा ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी मुंबईत झाली. या बैठकीला उपस्थित राहुन मार्गदर्शन केलं. 1/2 pic.twitter.com/WplTgAPoDM
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 7, 2022
दरम्यान, सत्तेत आल्यापासून यांना इम्पेरिकल डेटा देखील गोळा करता आला नाही. कोर्टानं वारंवार झापूनही यांच्यातला कोणतरी एक जण उठतो आणि केंद्राची जबाबदारी आहे सांगत सुटतो. अरे मग तुम्ही सरकारमध्ये कशाला आहात? द्या ना मग केंद्राच्या हाती. केंद्र सरकार चालवेल आणि करुनही दाखवेल", असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
तुम्ही काय फक्त माल कमावणार का?- देवेंद्र फडणवीस
मुजोरी चांगली नाही. पण ती शिकायची असेल तर महाविकास आघाडी सरकारकडून शिकली पाहिजे. तोंडावर पडले तरी बोट वर आहे. आजही हे लोक सर्व कोर्टानं सांगूनही यांच्यातील एखादा उठतो आणि सांगतो केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्रानं केलं तर होईल. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात? द्या ना केंद्राच्या हाती.
केंद्र सरकार चालवेल आणि करुन दाखवेल. तुम्हाला काय माशा मारण्यासाठी निवडून दिलंय का? माल कमावण्यासाठी की वसुलीसाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय?, असा रोखठोक सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.