मुंबई : दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र विलंबाने दाखल होणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सूनची यावर्षीची केरळमधील दाखल होण्याची तारीख जाहीर केली असून, त्या तारखेनुसार मान्सून केरळमध्ये ५ जून रोजी दाखल होईल.
देशातील चार महिन्यांचा मान्सून हंगाम १ जूनपासून सुरु होतो. मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो पुढे सरकत जुलैमध्ये देशाचा उत्तर भाग व्यापतो. १९०१ ते १९४० दरम्यान देशातील १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहेत. हे बदल होत असल्याने मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती. परिणामी हवामान खात्याने १९६१ ते २०१९ दरम्यान ५८ वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. तर १९७१ ते २०१९ दरम्यानच्या ४८ वर्षांच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल केले.
मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परतीच्या पावसाची तारीख १५ ऑॉक्टोबरच ठेवण्यात आली आहे. म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी मान्सून संपुर्ण देशातून माघार घेईल. यात काही बदल करण्यात आलेला नाही. मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख १० जून होती. आता ती ११ जून आहे. मान्सून मुंबईतून ८ ऑक्टोबर रोजी आपला परतीचा प्रवास सुरु करेल. परतीच्या पावसाची यापूवीर्ची तारीख २९ सप्टेंबर होती.
मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल झालावर्ष महिना२०१५ ५ जून२०१६ ८ जून२०१७ ३० मे२०१८ २९ मे२०१९ ८ जून
यंदाचा मान्सुनचा पाऊस केरळमध्ये ५ जून रोजी म्हणजे थोडक्यात विलंबाने दाखल होण्याची शक्यता गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १ जून आहे. शिवाय सुधारित वेळापत्रकानुसार मान्सूनचा महाराष्ट्रासह देशातील मुक्कामदेखील वाढला आहे. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग