आम्ही चालवू पुढे वारसा...
By admin | Published: June 22, 2016 02:38 AM2016-06-22T02:38:09+5:302016-06-22T02:38:09+5:30
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समस्त मुंबईकरांनी योगसाधना केली आणि देशाला लाभलेला योगविद्येचा वारसा पुढे चालू ठेवणार असल्याचेच दाखवून दिले.
टीम लोकमत, मुंबई
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समस्त मुंबईकरांनी योगसाधना केली आणि देशाला लाभलेला योगविद्येचा वारसा पुढे चालू ठेवणार असल्याचेच दाखवून दिले. पहाटेपासून सायंकाळपर्यंत अवघी मुंबापुरी योग साधनेत मग्न झाली होती. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण उत्साहाने सूर्यनमस्कार, पद्मासन, भुजंगासन करीत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत विविध स्वयंसेवी संस्था, योग संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही योग दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. योग साधनेविषयीचे मेसेज, योगासनांची चित्रे नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाली होती.
१८ हजार सुतारांनी साजरा केला योग दिवस
धुळीच्या कणांच्या संपर्कात सुतार सतत काम करीत असतात. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी फेव्हिकॉल चॅम्पियन क्लबचे सदस्य असलेल्या सुमारे १८ हजार सुतारांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
योगाचे धडे
शम्मीज योगालया फाउंडेशनच्या वतीने गेल्या आठवड्यापासून वरळी, घाटकोपर येथे योगवर्ग सुरू आहेत. योगाचा अधिक प्रचार, प्रसार व्हावा यासाठी मंगळवारी विशेष योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
योग जाणिवेची संवेदना -श्री श्री रविशंकर
आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून १५६ देशांनी योगासने केली. आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी योगवर्गाचे उद्घाटन केले. योगाचे महत्त्व सांगत त्यांनी परदेशी पाहुण्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. योगवर्गात वेगवेगळ््या वयोगटांतील नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी नेदरलँड, पोर्ट लँड, सॅन फ्रान्सिस्को, मेनिसोटा या देशांतील नागरिक उपस्थित होते.
विवेकानंद शिक्षण संस्था
योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीने आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही योगासने केली. प्रत्येक आसनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चमध्ये प्रा. डॉ. उदय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी योगाचे फायदे, उपचार पद्धती याविषयी माहिती देण्यात आली.
कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोअर परळ येथील सेंट रेजिसमध्ये एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कामाच्या व्यापातून नवी उमेद देणारा योगा हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता योगाचे आचरण प्रत्येक
दिवशी व्हायला हवे, असे मत उपस्थितांनी मांडले.
सेंट तेरेसा शाळेत
योगाचे धडे
योगाचे महत्त्व जाणत वांद्रे येथील सेंट तेरेसा बॉइज हायस्कूच्या विद्यार्थ्यांनी योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. खेळासोबतच योगाचेही महत्त्व कळावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सेंट तेरेसा बॉइज हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर निकी यांनी सांगितले. या योगवर्गाला शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.