मुंबई : कोळ्यांनी मुंबई जपली. मुंबईची संस्कृती वाढविली. आमच्या सात पिढ्या मुंबईत राहत आहेत. मुंबईला आम्ही आर्थिक केंद्र बनविले; आणि आता तुम्ही आम्हाला मुंबईतून बाहेर काढणार? असा सवालच कोळीवाड्यांनी प्रशासकीय यंत्रणेला विचारला. निमित्त होते ते मुंबईतल्या कोळी बांधवांनी बुधवारी आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाचे. या मोर्चानंतर कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाने महापालिकेलादेखील आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
मुंबईत जवळजवळ सर्वच कोळीवाड्यांमधील कोळीबांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मच्छिमारांच्या न्याय्य हक्कांसाठी मच्छिमार जन आक्रोश मोर्चात कोळी बांधवांनी अनेक समस्या मांडल्या. त्रासाबद्दल खंतदेखील व्यक्त केली. आमचा व्यवसाय उद् ध्वस्त करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. कोळी बांधवांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव रचला जात आहे. परिणामी कॉफ्रड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडळ येथील मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा. दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईतील मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा. वादळामुळे नुकसान झालेल्या कोळी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कोळीवाड्यांना गावठाणांचा दर्जा देण्यात यावा. थकीत डिझेल परतावा मच्छिमारांना देण्यात यावा, अशा मागण्या असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून सांगण्यात आले.