मुंबई : पत्रकारिता करताना कोणावर अन्याय तर होणार नाही ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे. वृत्त हे दिशाभूल करणारे नसावे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे. आपल्या पत्रकारितेचा समाजाला कसा फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे. तत्त्वे पाळली पाहिजेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, मुंबई प्रेस क्लबच्या रेड इंक अवॉर्ड २०२१ या दहाव्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून केले.
कोरोना काळात पत्रकारांनी जोखीम पत्करून काम केले. आरोग्य धोक्यात घातले. हे सगळे तुमच्यासाठी सोपे नाही, हे माहीत आहे. तुमच्या कुटुंबासाठी सोपे नाही हेदेखील माहीत आहे. तुमचे काम सोपे नाही. लोकशाहीची मूल्ये जपत आपण काम करत आहात, असे ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रेम शंकर झा यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झा यांनी आजवर विश्लेषणात्मक लिखाण केले असून, काश्मीर, चीन, अशा अनेक विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या सोहळ्यात विविध माध्यमांतील प्रतिनिधींना त्यांच्या कार्याबद्दल विविध विभागांत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
तत्त्वे पाळावीत : डिजिटल मीडिया, सोशल मीडियामुळे खूप बदल झाले आहेत. त्यामुळे वृत्त प्रसिद्ध करतानाच सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. एकदा का बातमी प्रसिद्ध झाली की, ती मागे घेता येत नाही. त्यामुळे पत्रकारितेची तत्त्वे प्रत्येक पत्रकाराने पाळलीच पाहिजेत; याकडेदेखील एन.व्ही. रमणा यांनी लक्ष वेधले.