- श्रीकांत जाधव
मुंबई : गायरान जमिनीचा मुद्दा, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, कंत्राटी नोकर भरती अशा मुद्दयांवर पीआरपी पक्ष लढा देत आहे. त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या उपस्थित नागपूर दीक्षाभूमीवर विशाल संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच मुंबई चैत्यभूमी येथून 'मी रिपब्लिकन' अभियानही सुरुवात करण्यात येत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.
तसेच, लोकसभेसाठी २ आणि विधानसभेसाठी १५ जागा आम्हाला हव्या आहेत, असेही प्रा. कवाडे म्हणाले. मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गायरान जमिनीच्या संरक्षणाच्या मुद्यावरच आम्ही शिंदे सरकारला पाठींबा देत आहोत. दलित, शोषित आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न पीआरपीच्या अजेंड्यावर नेहमी आग्रही राहिले आहेत. त्यामुळे कंत्राटी तलाठी, कामगार भरतीसारखे निर्णय जर सरकार घेत असेल तर त्याकडे सरकारचे लक्ष आम्ही वेधू.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रश्न सोडविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी पीआरपीच्या २३ ऑक्टोबर रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने होत असलेल्या विशाल संविधान सन्मान रॅलीच्या उदघाटनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे प्रा. कवाडे यांनी जाहीर केले. तसेच अधिवेश नागपुरात असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकसभेसाठी २, विधानसभेसाठी १५ जागा ! दलित बहुजनांच्या काही प्रमुख प्रश्नांसाठी आम्ही राज्य सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि सरकारला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आमचा सन्मान म्हणून शिंदे गटाच्या कोट्यातील लोकसभेच्या २ जागा आणि विधानसभेच्या १५ जागा आम्ही मागितल्या आहेत. तसेच मुंबई पालिका निवडणुकीचा विचार सुरु आहे. नागपूरच्या संविधान रॅलीत मुख्यमंत्री त्याबाबत घोषणा करीत असेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.