भाषेच्या बाबतीत दाक्षिणात्यांसारखा आक्रमकपणा आपल्यात हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 01:11 AM2021-02-28T01:11:58+5:302021-02-28T01:12:08+5:30
राज ठाकरे यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन गुजराती माणसे एकमेकांना भेटल्यावर गुजरातीत बोलतात. मात्र दोन मराठी माणसे एकमेकांसोबत हिंदीत बोलतात. आपल्यामध्ये भाषेच्या बाबतीत दाक्षिणात्यांसारखा आक्रमकपणा यायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले. शिवाजी पार्क येथे झालेल्या, ‘मराठीतच सही करा’ या अभियानाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे यांनी मराठीचा आग्रह धरण्याचे आवाहन केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मनसेने मराठी स्वाक्षरी अभियानाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, सायली संजीव, संजय मोने, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. सरकार शिवजयंती व मराठी भाषा दिनाला बंधने घालते, मात्र मंत्री गर्दी करून धुडगूस घालतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
कोरोना वाढत आहे असे वाटत असेल तर सरकारने निवडणुकाही पुढे ढकलाव्यात. सरकारला खरेच मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आहे का, की हेही संभाजीनगरसारखेच करायचे आहे. असे दिवस आल्यावरच सरकारला जाग का, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. त्यामुळे याला सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.