मुंबई : हिंदी महासागर क्षेत्रात भारतासमोरील आव्हान मोठे असून शेजारील राष्ट्रे आणि उर्वरित जगाशी सहकार्यात्मक सहभागाची आता गरज आहे, असे मत व्हाइस ॲडमिरल डॉ. संजय सिंह यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध व सामरिक अध्ययन केंद्राच्या वतीने ‘हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सिंह यांनी बोलत होते.
बंदरांतर्गत वाहतूक वाढवण्याची गरज असल्याचे अधोरेखित करताना डॉ. संजय सिंह यांनी भारताने सागरी आणि आंतरदेशीय मासेमारी पूर्ण क्षमतेने वापरण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. यावेळी समारोप सत्रात इंडोनेशियाचे वाणिज्य दूतावास (सामाजिक सांस्कृतिक) अधिकारी एको जूनोर यांनी हिंदी महासागरातील सहकार्याबाबत आपले विचार मांडले.
त्यानंतर संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी भारताच्या व्यापक राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात मत व्यक्त केले. परिसंवादात देशातील ३०० हून अधिक विद्यार्थी आणि शोधनिबंधकासह बांगलादेश, लाओस, तैवान आणि नॉर्वेचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
८८ शोधनिबंध सादरयावेळी जवळपास दीडशे संशोधकांनी ८८ शोधनिबंध सादर केले. विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या चार पॅनलद्वारे भौगोलिक धोरणात्मक गतिशीलता, पर्यावरणीय आव्हाने, आर्थिक संधी आणि सागरी सुरक्षा अशा विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जमिनीवरील गतिशीलता, सागरी क्षेत्रातील आव्हाने, पर्यावरण आणि हवामान बदल आणि आर्थिक विकास आणि व्यापार यावर विविध सत्रे आयोजित करण्यात आली होती.