CoronaVirus: ‘वर्क फ्रॉम होम’साठी नियमांची चौकट हवी - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:08 AM2020-04-30T06:08:19+5:302020-04-30T06:08:54+5:30

या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे आणि वर्क फ्रॉम होमच्या नियमांची चौकट तयार करायला हवी, अशी भूमिका राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडली आहे.

We need a framework of rules for 'work from home' - Satej Patil | CoronaVirus: ‘वर्क फ्रॉम होम’साठी नियमांची चौकट हवी - सतेज पाटील

CoronaVirus: ‘वर्क फ्रॉम होम’साठी नियमांची चौकट हवी - सतेज पाटील

Next

मुंबई : कोरोनामुळे भविष्यात वर्क फ्रॉम होमची संकल्पना वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क देणे हे मोठे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे आणि वर्क फ्रॉम होमच्या नियमांची चौकट तयार करायला हवी, अशी भूमिका राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची सद्यस्थिती व कोरोना नंतरच्या काळातील रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी राज्यमंत्री पाटील यांनी राज्य सरकारच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोना नंतरच्या काळातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासमोरील आव्हानांबाबत एक सविस्तर मसुदा तयार करण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी देशामध्ये एक समिती स्थापन करण्याची मागणीही पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्य हे मुंबईला फिनटेक कॅपिटल म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकामी केंद्र सरकारने सहकार्य करायला हवे, अशी सूचना राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी केली. भारत नेट- २ उपक्रम अधिक सक्षम करण्यासाठी केंद्राने तातडीने राज्याला आवश्यक निधी द्यावा, आधार सक्षम पेमेंट सिस्टिम वापरण्याला प्रोत्साहन द्यावे अशी मागणीही पाटील यांनी केली.
येत्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये डिजीटलायझेशनची वाढ होणार आहे. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत पूढाकार घेवून धोरणात्मक निर्णय घ्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,रोबोटिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रात बरचे नवीन संशोधन केले आहे. या नवनवीन शोधांना मंजूरी देण्यासाठी तसेच ते प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक खिडकी योजना आखावी, असे पाटील म्हणाले.

Web Title: We need a framework of rules for 'work from home' - Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.