लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिफायनरीच्या विरोधात बारसू पंचक्रोशी ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. एकही कार्यकर्ता गावाबाहेरचा नाही. कोणत्याही बाहेरच्या संस्थेची आम्हाला मदत नाही. आम्हाला तुम्ही बाहेरचे म्हणता, मग आम्हाला हद्दपारीच्या नोटिसा कशाला? असा सवाल बारसू- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तुम्ही जे आरोप करता,ते सिद्ध करून दाखवा, हवे तर आमची बँक खाती चेक करा; अन्यथा आंदोलकांची माफी मागा, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
बारसू- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू आंदोलकांना फंडिंगबाबत जे वक्तव्य केले त्याबाबत संघटनेचे सत्यजित चव्हाण, दीपक जोशी, नितीन जठार, गोपीनाथ घाग, शंकर जोशी यांनी खुलासा केला.
सामंत राज्याचे की; बारसूचे उद्योगमंत्री! यावेळी आंदोलकांनी आव्हान केले. गृहमंत्र्यांनी जे आरोप आंदोलकांवर केले आहेत, ते पहिले सिद्ध करून दाखवा. तुम्हाला संशय असेल, तर आमची बँक खाती चेक करा; पण खोटे आरोप करू नका. विधान परिषदेसारखा न्यायमंदिरात असे घडणे योग्य नाही. रिफायनरी करायची असे म्हणता, मग दोन वर्षांत एकदाही वेळ का दिला नाही, असे सांगत बारसू आंदोलकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्ला चढवला. सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री आहेत की; बारसूचे, अशा शब्दांत त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. रिफायनरीसाठी दडपशाही कराल तर उदय सामंत यांच्या मतदारसंघात जाऊन विरोधी प्रचार करू, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.