आम्ही पॉझिटिव्ह : माझे कुटुंब, माझी जबाबदारी : आम्ही कोरोनाला हरविले; तुम्हीही हरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:24+5:302021-04-26T04:06:24+5:30
धारावीतील शाळेतील शिक्षक चांगदेव एकनाथ वीर यांच्यासह त्यांच्या पत्नीने कोरोनावर मिळविला विजय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकार ...
धारावीतील शाळेतील शिक्षक चांगदेव एकनाथ वीर यांच्यासह त्यांच्या पत्नीने कोरोनावर मिळविला विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकार असो. महापालिका असो. कुटुंब असो. मित्र परिवार असो. या सर्वांनी दिलेला धीर, आत्मविश्वास, वेळेच्या वेळी घेतलेली औषधे, कोविड सेंटरमध्ये मिळालेल्या चांगल्या उपचारांसह इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कुटुंबाने दिलेल्या साथीमुळे मी कोरोनासारख्या आजारातून लवकर बरे झालो. आम्ही आपली जबाबदारी ओळखली. नियमांचे पालन केले. म्हणून आम्ही कोरोनाला हरवू शकलो. तुम्हीदेखील नियमांचे पालन केले. शासनाने घालून दिलेल्या कठोर निर्बंधांचे पालन केले तर आपण नक्कीच कोरोनाला हरवून दाखवू, असा विश्वास धारावीमधील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले चांगदेव एकनाथ वीर यांनी व्यक्त केला.
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या धारावीमधील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले चांगदेव एकनाथ वीर यांनी सांगितले की, जेव्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तेव्हा मी सरकारी कर्मचारी असल्याने माझा शासनावर ठाम विश्वास होता की शासनाने जी कोविड सेंटर निर्माण केली आहेत; त्या कोविड सेंटरमध्ये महापालिकेच्या डॉक्टरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी महापालिकेच्या राधास्वामी या कोविड सेंटरमध्ये दाखल झालो.
मी तिथे आठ दिवस होतो. आठ दिवस विलगीकरणात होतो. तेथील कोविड सेंटरमधील प्रशासन ठरलेल्या वेळेत रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण देणे. डॉक्टरांच्या निगराणीखाली विलगीकरणाच्या रुग्णाला वेळच्या वेळी तापमान मोजून देणे. आणि त्यांची ऑक्सिजन लेव्हल तपासून रुग्णांना तुम्ही बरे आहात, तुम्ही बरे होणार, आम्ही तुमच्या कायम सोबत आहोत; असा कायम सकारात्मक विचार देत काळजी घेत होते. येथे सुसज्ज व्यवस्था असल्याने रुग्णांना काही त्रास नव्हता. प्रचंड इच्छाशक्ती, मनामध्ये कोणत्याही प्रकाराची भीती नसल्याने, वेळच्या वेळी घेतलेल्या उपचारामुळे, वाफ आणि गरम पाण्यामुळे मी ठणठणीत बरा झालो. या सगळ्याचे श्रेय महापालिकेच्या कोविड टीमला देतो.
----------------------
आजपासून ‘आम्ही पॉझिटिव्ह’
कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना, परिस्थिती आर्थिकदृष्ट्या बिकट झालेली असताना, मानसिकता ढासळलेली असताना अशा साऱ्या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडत सकारात्मक वातावरणाकडे झेप घेण्यासाठी ‘लोकमत’ने आजपासून ‘आम्ही पॉझिटिव्ह’ हे सदर सुरू केले आहे. या माध्यमांतून कोरोनावर मात करणाऱ्या वीरांचे अनुभव कथन केले जाणार असून, जगण्याची नवी उमेद देण्याचा प्रयत्न होणार आहे.
----------------------
मी, माझी पत्नी आणि कोरोना...
माझ्या कुटुंबात माझी पत्नीदेखील कोरोना पॉझिटिव्ह होती. माझा दीड वर्षाचा मुलगा, माझा दहा वर्षांचा मुलगा यांना घरात कोणतेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी महापालिकेवर विश्वास ठेवून, महापालिकेच्या उपचारावर विश्वास ठेवून कोविड सेंटरमध्ये दाखल झालो. माझ्या पत्नी घरात आयसोलेटेड होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरदिवशी महापालिकेचे कर्मचारी फोन करून माझ्या पत्नीच्या आरोग्याची चौकशी करत होते. तुम्ही कसे आहात. तुमची तब्येत बरी आहे का? काही अडचण आहे का? काही मदत हवी आहे का? याचा अर्थ सर्व नागरिकांनी महापालिकेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवत त्यांची सेवा घ्यावी. कारण ही यंत्रणा दिवसाचे २४ तास आपल्यासाठी काम करत असते.
----------------------
महापालिका आली धावून...
माझा विमा होता. खासगी रुग्णालयात जाऊन मी दहा दिवस उपचार घेतले असते. मात्र विनाकारण विम्याचे पैसे तरी का घालवा. म्हणून महापालिकेवर विश्वास ठेवत त्यांच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. येथे चांगले उपचार होतात हा आत्मविश्वास असल्याने तेथे उपचार घेतले.
----------------------
धारावी सुरक्षित
धारावीमध्ये कमी घनतेमध्ये जास्त लोकसंख्या आहे. माझ्या शाळेतदेखील कोविड सेंटर होते. धारावीमध्ये मुंबई महापालिका आणि शासनाने जी काही विशेष मोहीम राबविली तिचा फायदा झाला. घरोघरी जाऊन त्यांनी तपासणी केली. शोध घेतला. ज्यामुळे आज धारावी सुरक्षित आहे. कारण मुंबई महापालिका आणि शासनाने चांगले काम केले.
----------------------
कोरोना पसरणार नाही
आज धारावीत रुग्ण कमी आहेत. लसीकरणदेखील तिथे मोठ्या प्रमाणावर होते आहे. मुंबई महापालिकेचे धारावीकडे सातत्याने लक्ष आहे. तिथले सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष येथे कोरोना पसरणार नाही याची काळजी घेत आहेत.
----------------------
इच्छाशक्ती आणि मनाची तयारी
आपण सकारात्मक विचार केला. प्रचंड इच्छाशक्ती आणि मनाची तयारी असली की आपण यातून बरे होणार. महापालिकेने दिलेल्या टिप्स आणि त्यांनी सांगितलेली काळजी आपण घेतली तर आपण कोरोनातून हमखास बरे होऊ शकतो.