आम्ही रेराचा नंबर देतो हीच आमची गॅरंटी आहे! महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:04 AM2024-03-04T11:04:47+5:302024-03-04T11:05:10+5:30
गुणवत्तेचे निकष बिल्डरने पाळले आहेत की नाही? हे पाहण्याचे काम केले जाते आहे, असेही अजय मेहता यांनी नमूद केले.
मुंबई : आम्ही प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला रेरा नंबर देत आहोत. हीच आमची गॅरंटी आहे. यामुळे ग्राहक डोळे बंद करून गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक करू शकत आहेत, असा विश्वास महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांनी लोकमत आणि रुस्तोगी इस्टेटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’मध्ये व्यक्त केला. बिल्डर जेव्हा बिल्डिंग बांधतो तेव्हा तो गृहनिर्माण क्षेत्राशी असलेल्या कोणत्याही घटकांशी तडजोड करणार नाही. गुणवत्तेचे निकष बिल्डरने पाळले आहेत की नाही? हे पाहण्याचे काम केले जाते आहे, असेही अजय मेहता यांनी नमूद केले.
गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी महारेराने काय केले ?
गृहनिर्माण प्रकल्प उभा करायचा असेल तर यापूर्वी ५० हून अधिक परवानग्या लागत होत्या. हे परवाने घेण्यामध्ये बिल्डरांचा पुष्कळ वेळ वाया जात होता. परिणामी प्रकल्पही वेळेत पूर्ण होत नव्हता. त्याचा ग्राहकांना फटका बसायचा. महारेराची स्थापना झाल्यानंतर आम्ही या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नव्या पद्धती लागू केल्या. आम्ही ग्रेडिंग सिस्टम सुरू केली. त्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या शहरांचा विचार केला तर दिल्लीमध्ये एक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागत होती. मुंबईमध्ये हा कालावधी दोन वर्षांचा होता. पुण्यामध्ये गृहनिर्माण प्रकल्प एक वर्ष विलंबाने पूर्ण होत होता. त्याचा मोठा फटका रिअल इस्टेट क्षेत्राला बसत होता. आम्ही ग्रेडिंग सिस्टम सुरू केल्याने तारखा दिल्या गेल्या. याचा असा फरक पडला की, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ लागले. प्रकल्पाची गॅरंटी मिळू लागली. घर घेणाऱ्या ग्राहकांना त्याचा अधिकार मिळावा, म्हणून काय केले जाते ?
ग्राहकांना बिल्डरांकडून नेहमी चांगले प्रॉमिसेस पाहिजे असतात. बिल्डरने गृहनिर्माण प्रकल्प उभा करताना जेवढा एरिया सांगितला आहे, तेवढा दिला पाहिजे. बांधकामामध्ये गुणवत्ता राखली पाहिजे. ग्राहक बिल्डरला जर पैसा देत असेल तर त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे. ग्राहकांना अडचणी आल्या आणि त्यांच्या समस्या सुटू शकल्या नाहीत तर त्यांना महारेराकडे येण्याचा अधिकार आहे.
बांधकामात गुणवत्तेचा आग्रह कसा धरला जातो?
बिल्डर जेव्हा बिल्डिंग बांधतो तेव्हा तो गृहनिर्माण क्षेत्राशी असलेल्या कोणत्याच घटकाची तडजोड करणार नाही. गुणवत्ता देईल हे पाहण्याचे काम आम्ही करतो. रिअल टाइम कॉलिटी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. गुणवत्तेचे सगळे निकष बिल्डरने पाळले आहेत की नाही? हे पाहण्याचे काम केले जाते.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसे करत आहात?
महारेराने काम करताना माहिती आणि तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर दिला आहे. आम्ही कागदोपत्री काम कमी केले आहे. अधिकाधिक टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे. सगळीच कामे ऑनलाइन होत असल्याने पारदर्शकता आली आहे. याचा परिणाम म्हणून कोणावरही एकावर अन्याय होत नाही. आम्ही प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाला वेगळा नंबर देत आहोत, हीच आमची गॅरंटी आहे. यामुळे ग्राहक डोळे बंद करून गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक करू शकत आहे. कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पाला नंबर दिला जातो तेव्हा सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. बिल्डिंगला सीसी आहे की नाही? अशा अनेक गोष्टी पाहिल्या जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत नाही. टायटल क्लिअर आहे का? अशा सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असल्याने परिस्थिती बदलत आहे.
बिल्डरांकडून कसे सहकार्य अपेक्षित आहे?
गेल्या पाच वर्षांमध्ये गृहनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होत आहे. सरकार त्यांच्या परीने पायाभूत सेवासुविधा उभारण्याचे काम करत आहे. या पायाभूत सेवासुविधांमुळे गृह निर्माण क्षेत्राला उभारी मिळत आहे. आता गृहनिर्माण क्षेत्रात अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी बिल्डरांनी सहकार्य केले पाहिजे. दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत. या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही एका गोष्टीवरच लक्ष केंद्रित केले आहे, ते म्हणजे बिल्डरने गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करताना ज्या सेवा नमूद केल्या आहेत, त्या त्याने ग्राहकांना दिल्या पाहिजेत.