मुंबई - सध्याच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाकडे लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर झाला. या मेळाव्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तडाखेबाज भाषण करत शिंदे गट आणि भाजपवर जबरी टीका केली. तसेच, नारायण राणे यांचाही समाचार घेतला. त्यामुळे, सुषमा अंधारे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे, शिंदे विरुद्ध ठाकरे वाद विकोपाला गेला आहे. त्यावरुन, सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपलाही लक्ष्य केलं.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर भाजपवर निशाणा साधत, तुम्ही एकनाथ शिंदेंचं टूल वापरुन डाव रचला अन् जिंकला, असे म्हटले. तसेच, भाजप नेत्यांचं अभिनंदही त्यांनी केलं आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाहजी, देवेंद्र फडणवीसजी जिंकलाय तुम्ही. तुमचं कुटील राजकारण जिंकलंय, मुख्यमंत्री एकनाथ जिंकले नाहीत, ते फक्त टूल आहेत, ते टूल वापरून तुम्ही डाव रचला. पण, जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब लांब पडतात ना, तेव्हा समजून जावं की अंधार जास्त पडत चाललाय. खूप अंधार पडत चाललाय. आम्ही उजेडासाठी लढत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, खडकातूनही उगवून येऊ,'' असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली. तसेच, या कारस्थान पाठीमागे भाजप आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही, असेही अंधारे यांनी म्हटलं.
शरद पवारांनी सूचवले नाव
खासदार शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.शिवसेनेचे चिन्ह आणि नावावर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही कोणताही परिणाम होणार नाही.सेनेला आता तातपुरते नवे नाव शोधावे लागणार आहे. मी असं नाव सुचविन की, शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे, असं नाव द्यायला पाहिजे, असं शरद पवार यांनी शिवसेनेला नवे नाव सुचविले. हे असं याअगोदर काँग्रेसमध्ये झाले आहे, याअगोदर इंदीरा गांधी यांच्या काळात झालेल्या दोन घटनांचे पवार यांनी यावेळी उदाहरण दिले.
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील अंतर्गत वादामुळे आता पक्षाचे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच शिवसेना पक्षाचे नावही तात्पुरता वापरता येणार नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना कोणत चिन्ह आणि नाव वापरणार या चर्चा सुरू झाल्या आहेत.