मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देत भाजपने सर्वांनाच धक्का दिला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवता दुसरा धक्का भाजपने दिला. राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर देशात महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होत आहे. तर, आता मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध सर्वांनाच लागले आहे. त्यातच, 3 आणि 4 तारखेला एकनाथ शिंदेंना बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार असून आपल्याकडे 175 आमदारांचं संख्याबळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, मंत्रीमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमेवत गेलेल्या शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांना आणि 11 अपक्षा आमदारांपैकी कोणाकोणाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार याची चर्चा होत असतानाच, आता रिपाइंच्या आठवले गटाकडूनही मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपाइं आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी ट्विटरवरुन ही मागणी केली आहे. भाजपचा सह्योगी गट असल्याने रिपाइं गटालाही शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंचं अभिनंदनही केलं आहे. दरम्यान, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना संधी देऊन देवेंद्र फडणवीस राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. महाराष्ट्राच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य देत आदर्श इतिहास घडविल्याचेही आठवेलींनी म्हटले.
औरंगाबादमधून संधी कुणाला?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता. औरंगाबादला कोण पालकमंत्री म्हणून लाभणार, यावरून चर्चा रंगते आहे. मागील १२ वर्षांत जिल्ह्याला बाहेरीलच पालकमंत्री लाभले आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील जे मंत्री होतील, त्यांच्याकडेच पालकमंत्री जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते.