संडे स्पेशल मुलाखत ; मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 07:09 AM2019-11-03T07:09:51+5:302019-11-03T07:57:55+5:30

राज्याचे हित केवळ आम्हीच पाहायचे?

We should get the CM, Sanjay raut insist for chief minister | संडे स्पेशल मुलाखत ; मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायम

संडे स्पेशल मुलाखत ; मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायम

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : आम्हाला पाप करायला लावू नका, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी जेवढी आमची आहे, तेवढीच तुमचीही आहे. राज्याचे हित आम्हीच पहायचे आणि तुम्ही पदांसाठीच आग्रही राहायचे, हे किती दिवस चालणार? मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत आम्ही चर्चेला तयार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केले.

राज्याच्या हिताची जबाबदारी आमचीच आहे? त्यांची नाही? असा सवाल करून ते म्हणाले की, जागांचे समसमान वाटप ठरले होते, तरीही आम्ही त्यांची अडचण समजून घेतली. अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरले त्याचे पालन करा, एवढेच आमचे म्हणणे आहे. संजय राऊ त यांची भूमिका पुढीलप्रमाणे :

तिढा सोडवण्याची जबाबदारी भाजपची की शिवसेनेची? की दिल्लीतील नेत्यांनी?
ही जबाबदारी आमची असूच शकत नाही. ज्यांना सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, त्यानी सरकार स्थापन करण्याची भूमिका पार पाडावी. राज्यातले विषय राज्यातच सोडवावेत, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्याच्या प्रश्नात किती लक्ष घालावे? राज्यातल्या ज्या नेत्यांना प्रश्न सोडवायला सांगितले, त्यांचे हे अपयश आहे.

आमच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत, असे आधीही तुमचे नेते सांगत होते. त्यामुळे आताचे वादळ पेल्यातीलच ठरेल की काय?
तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आम्ही वेगवेगळे लढून एकत्र आलो होतो. आता आम्ही एकत्रपणे जनतेचा कौल मागितला. जनतेने तो दिला. सत्तेचे समानवाटप हे निवडणुकीला सामोरे जाताना जाहीर केले होते. आता जो पक्ष शिवशाही आणण्याची भाषा करतो, रामाच्या नावावर मतं मागतो त्या पक्षाने शिवाजी महाराज व श्रीरामासारखे शब्दाचे पक्केअसावे, एवढीच अपेक्षा आहे.

खा. हुसेन दलवाई यांनी भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी शिवसेनेसोबत जावे, असे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले आहे...?
भाजपला हरवणे हे आमचे ध्येय नव्हते आणि नाही. सत्तेचा मोह असता तर आम्ही वेगवेगळे पक्ष, नेते गिळंकृत केले असते, तर राजकारण वेगळे दिसले असते. आमचा तो स्वभाव नाही, कोणी पक्ष व नेते गिळले हे सर्वज्ञात आहे.

तुमचा इशारा भाजपकडे आहे का?
मी कोणाचेही ना घेत नाही. राजकारणात अशा वृत्ती असतात. त्या ज्यांच्याकडे आहेत, त्यांनीच विचार करावा.

भाजपने शपथविधीची तयारी सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.
त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे १४५ आमदार असल्यास खुशाल पदग्रहण करावे. त्यांचा सभागृहात पराभव झाला तर दुसरा सर्वाधिक संख्येचा पक्ष म्हणून राज्यपाल आम्हाला बोलावतील, आम्ही बहुमत सिध्द करू.
 

Web Title: We should get the CM, Sanjay raut insist for chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.