आम्हाला तुमचे संगीत ऐकायला मिळायला पाहिजे - डॉ.मोहन भागवत
By मनोहर कुंभेजकर | Published: June 28, 2024 05:18 PM2024-06-28T17:18:43+5:302024-06-28T17:19:04+5:30
स्वर स्वामींनी आशा पुस्तकाचे शानदार प्रकाशन, आपण मनाला तरुण ठेवा,स्वतःला म्हातारे म्हणू नका,आयुष्याची मशाल सतत जागृत ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुंबई-संगीत हा माझा विषय नसला तरी संघात मी गाणी गातो.मंगेशकर परिवाराबद्धल माझ्या मनात आपुलकीची भावना आहे.लहानपणा पासून त्यांची गाणी ऐकत आलो आहे.कानात गुंजत असणारे आवडणारे निर्मळ संगीत आणि देशभक्ती पर संगीत देणारे मंगेशकरांचे संगीत असून त्यांचे संगीतात मोठे योगदान आहे.त्यांची गाणी ऐकत संस्कार येतात.गाणे मनात उतरून जीवन घडते आणि त्यामुळे अडचणीच्या काळात संगीतमुळे सकारत्मकता वाढते.घरोघरी गाणे पोहचवणाऱ्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले या खरोखरी सांगिताच्या जादूगार असून सृष्टीचे सर्व घटक त्यांच्या संगीतात आहे. त्यामुळे सतत तुम्ही गात राहिले पाहिजे आणि आम्हाला तुमचे संगीत ऐकायला मिळायला पाहिजे असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आज पार्ल्यात केले.
जेष्ठ गायिका,पद्मभूषण आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे स्वर स्वामींनी आशा या पुस्तकाचे शानदार प्रकाशन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते आज दीनानाथ नाट्यगृह,विलेपार्ले येथे पार पडला.यावेळी मंचकावर आशा भोसले ,मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार,प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, व्हॅल्यूएबल ग्रूपचे नरेंद्र हेटे आणि अमेय हेटे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शाल,पुष्पगुच्छ, फुलांची परडी,भेटवस्तू देवून आणि 90 दिव्यांनी त्यांना वेदमंत्रात ओवळण्यात आले. तर प्रसिद्ध गायक यांनी गुलाब फुलांनी त्यांचे पाय धुतले व भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना आशा भोसले म्हणाल्या की,माझे जीवन हे संगीतकार,टेक्निशियन, आणि मेकअप आर्टिस्ट यांनी घडवले.तसेच प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके, यशवंत देव आणि माझा भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा देखिल मोठा वाटा आहे.गाणे हे हृदयातून आले पाहिजे, आपण मनाला तरुण ठेवा,स्वतःला म्हातारे म्हणू नका,आयुष्याची मशाल सतत जागृत ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मला राजकारण काही कळत नाही,माझ्या बाबतीत राजकारण झाले ते मला आत्ता कुठे कळायला लागले असे सांगून राजकारणात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी,स्वातंत्र्यवीर सावरकर,डॉ.मोहन भागवत,अँड.आशिष शेलार आदी आवडतात असे त्यांनी सांगितले. आमदार अँड.आशिष शेलार म्हणाले की,आमच्या विचारांचे दैवत हे डॉ.मोहन भागवत असून सुरांचे दैवत आशाताई आहे.या पुस्तकात चाटूगिरी नसून वाचकांना समाधान देणारे आहे.हे पुस्तक म्हणजे एक अमूल्य ठेवा असून एक वैचारिक अधिष्ठान आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन जीवनगाणीचे प्रसाद महाडकर व व्हल्युएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे व अमेय हेटे यांनी केले होते.तर डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
अशोक सराफ,निवेदिता सराफ,अनुराधा पोडवाल,सोनू निगम,सुदेश भोसले,सुरेश वाडकर,श्रीधर फडके,पद्मजा फेणाणी,पूनम धिल्लन,हरिष भिमानी,अशोक हांडे,राणी वर्मा,उत्तरा केळकर,पुरुषोत्तम बेर्डे,सुधीर गाडगीळ,वैशाली सामंत,डॉ.तात्याराव लहाने, मंगला खाडिलकर,मीना कर्णिक,पुष्कर श्रोत्री, तुषार श्रोत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांना आमदार अँड.आशिष शेलार यांच्या हस्ते स्वर स्वामींनी आशा या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली.