मुंबई : धूळ, माती, वायू आणि ध्वनी प्रदूषणासह कोरोनाशी दोन हात करत वाहतूक पोलीस आजही काम करत असून, अशाच काहीशा परिस्थितीमध्ये जोगेश्वरी वाहतूक व्यवस्था विभागाचे वाहतूक पोलिस बांधव काम करत असून, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. ते नसते, त्यांनी आपली ड्युटी बजावली नसती तर वाहतुकीचा खोळंबा झाला असता; परिणामी अशा वाहतुक पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन करत आपल्या चार वर्षीय मुलीला घरी ठेवून आपले कर्तव्य पार पाडणा-या वाहतूक विभागाच्या हवालदार सुनिता जाधव यांच्या कार्याला लक्ष सामाजिक प्रतिष्ठानने सलाम केला आहे.सुनिता जाधव हे तर प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे कित्येक वाहतूक पोलीस आज दिवसभर न थकता आपले काम करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी देखील आपले कर्तव्य पार पाडले आहे. अशी मोठी माणसे समाजासाठी काम करताना आपण त्यांना साथ दिली पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन लक्ष सामाजिक प्रतिष्ठानने केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाने, वाहन चालकाने आपले काम नीट केले तर त्यांच्यावर जो भार आहे तो हलका होईल. शिवाय त्यांच्यावर त्यांच्यावर ताण येणार नाही, असे प्रतिष्ठानने म्हटले आहे.