Join us

नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असताना रात्री साधारण १२.३० ते १ च्या सुमारास मोठा आवाज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असताना रात्री साधारण १२.३० ते १ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने आम्ही घरातून बाहेर पळालो. बाहेर जाऊन पाहिले तर आमच्याच घराच्या दुसऱ्या दरवाजावर कोसळलेल्या भिंतीचा सगळा मलबा येऊन अडकला होता. त्याच दरवाज्याजवळ आमचा लहान मुलगा उभा होता. हा दरवाजा जर घटनेच्यावेळी उघडा असता तर त्याच्यासह आमच्याही जीवावर बेतले असते, अशी प्रतिक्रिया चेंबूर येथील रुखसाना खान यांनी दिली.

सुनीता आणि आरती मानके या बहिणींनी सांगितले की, घरावर दरड कोसळल्याने मोठा आवाज झाल्यामुळे आम्ही घराबाहेर पडलो. शॉर्टसर्किट झाल्यामुळे आम्हाला विजेचा झटका बसून पायाला जखमही झाली. पण सुदैवाने तेवढ्यावरच निभावले. दरड वीज मीटरवर कोसळल्याने शॉर्टसर्किट झाले, पण वेळीच घराबाहेर पडल्याने जीव वाचल्याची भावना सैरउन्नीसा शेख यांनी व्यक्त केली. या घटनेवेळी आम्ही वरच्या माळ्यावर झोपलो होतो, त्यामुळे वाचलो. आवाज आल्यानंतर खाली येऊन पाहिले तर आमच्या घराचा खालचा भाग चिखलात संपूर्ण बूडून गेला होता.

अन् आईने हंबरडा फोडला !

येथील एक महिला दररोज रात्रपाळीला कामाला जाताना मुलीला आत ठेवून घराला बाहेरून कुलूप लावत असे. यामुळे घटनेच्यावेळी घरात एकट्या असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीला बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. जेव्हा तिची आई घरी आली तेव्हा मुलीची अवस्था पाहून आईने हंबरडाच फोडला.

एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी आणि तीन मुलींचा समावेश आहे. दुसऱ्या एका घरात मुलगी आणि जावयासोबत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. मुलगी आणि जावई घरी नसल्याने वाचले.

डोळ्यासमोर घर कोसळले

रात्री १२.३०च्या दरम्यान लुघशंकेसाठी घराबाहेर गेलो होतो, त्याचवेळी दरड कोसळत असल्याचे मला दिसले. मी आणि माझ्या मुलांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली पण तोपर्यंत घरही पडल्याचे प्रत्यक्षदर्शी मुस्ताक खान यांनी सांगितले.