आम्ही तुमचे आरोग्य जपतो, तुम्ही घरीच बसा; महापालिकेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:08 AM2020-05-25T01:08:10+5:302020-05-25T01:08:25+5:30
मुंबईकरांसाठी ‘जम्बो फॅसिलिटी’
मुंबई : मुंबईकरांचे आरोग्य जपण्यासाठी, कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्याची पूर्ण तयारी आम्ही केली आहे. आता मुंबईकरांनी घरी राहूनच आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर, (खासगी व सरकारी) मिळून आरोग्य संस्थांमधल्या एकत्रित खाटांची संख्या ही ६ हजार १३० आहे. नव्याने तयार केलेल्या निरनिराळ्या सुविधा संस्थांमार्फत (जम्बो फॅसिलिटी) निर्माण होणाऱ्या अतिरिक्त खाटांच्या क्षमतेमुळे ३१ मेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होईल.
आॅक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असलेल्या खाटांची सुविधाही यातून बळकट होईल. सर्व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर मिळून १० हजार खाटांपर्यंत क्षमता नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. अतिदक्षता खाटांची संख्या ५३५ असून, त्यांची संख्या १ हजारांपर्यंत वाढविण्यात येत आहे.
यासोबतच भर म्हणून खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम यांना त्यांच्याकडील उपलब्ध अतिरिक्त खाटांसह समावेश करण्यात येणार आहे. मात्र असे असले तरीही मुंबईकरांनी लॉकडाउन पाळावे. काम नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेच्या २४ विभागांत आरोग्य स्वयंसेविका, स्थानिक स्वयंसेवक हे झोपड्यांत रोज घरोघरी दाखल होत सर्वेक्षण करत आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, १ हजार पथके रोज ६ ते ७ लाख लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या पथकांनी शोध घेतलेल्या व्यक्तींना दवाखाने, कोरोना काळजी केंद्रामध्ये संदर्भित केले जाते. घरांच्या सर्वेक्षणाचे लक्ष्य गाठल्यानंतर फेरसर्वेक्षण केले जाते. अशा पद्धतीनुसार आजवर ५८ लाख १४ हजार ३४० घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यातील ७ हजार ४४७ संशयितांना संदर्भित करण्यात आले आहे. रुग्णांच्या अति जोखीम संपर्कातील ५२ हजार ७९८ व्यक्तींचाही शोध घेण्यात आला आहे. यापैकी ३६ हजार १६७ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
आतापर्यंत १० लाख २५ हजार ६२ घरापर्यंत पोहोचत जवळपास १ लाख ६८ हजार ६७८ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात
आली. यापैकी १ हजार २७९ ज्येष्ठ नागरिकांची आॅक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आढळली. त्यांना लगतच्या रुग्णालय, दवाखाने येथे संदर्भित करण्यात आले.
झोपडपट्टीत, प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य शिबिर
च्झोपड्या आणि प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. आजवर ३५७ शिबिरे घेण्यात आली. त्यातून १८ हजार ६४३ अति जोखीम गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या. ५ हजार १८८ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यातील ६८३ प्रकरणे बाधित आढळली. बाधितांना विलगीकरण करून उपचार करण्यात येत आहेत.
च्एप्रिल २०२०मध्ये सर्व सरकारी डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल मिळून १ हजार ९६० खाटा उपलब्ध होत्या. त्यांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या ३ हजार ६५७ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये सरकारी आणि खासगी अशा मिळून एकूण ३८ रुग्णालयांत ५ हजार ३० खाटा उपलब्ध आहेत.