आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:13+5:302021-01-17T04:07:13+5:30
कोविड योद्धयांचे सर्वसामान्यांना आवाहन आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्या कोविड योद्धयांचे सर्वसामान्यांना आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
कोविड योद्धयांचे सर्वसामान्यांना आवाहन
आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्या
कोविड योद्धयांचे सर्वसामान्यांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तीव्र संसर्ग काळात मुंबई महापालिकेचे नायर रुग्णालय हे सर्वात आधी संपूर्णंता कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या रुग्णालयात लसीकरणाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवार सायंकाळपासून उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. शनिवारी सकाळी लसीकरण केंद्रातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाने ‘आम्ही लस घेतली तुम्हीही निर्धास्तपणे घ्या’ असा संदेश दिला.
नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर प्रतीक्षा कक्ष तयार केला असून येथे बसून अनेक जण आपला नोंदणी क्रमांक पुकारण्याची वाट पाहत बसले होते. अन्य कर्मचारी-अधिकारी आणि डॉक्टरांना फिजिकल डिन्स्टसिंग पाळून कक्षाच्या गेटजवळ रांगेत उभे करण्यात आले होते. या केंद्राच्या मुख्य लसीकरण कक्षात एकाच वेळी सहाहून अधिक जणांना लस देण्याची सुविधा उपलब्ध आहे . त्याशेजारी निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे.
या ठिकाणी लसीचा डोस घेणारा प्रत्येक जण अत्यंत आनंदी हाेता, शिवाय प्रत्येक जण लसीकरण कक्षात लस घेतानाचा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी धडपडताना दिसून आला. नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर पालिकेच्या वतीने ‘मी लस घेतली, लस घेतल्याचा आनंद आहे’ असे भित्तीपत्र लावण्यात आले होते. लसीकरण कक्षाबाहेर येणारे बरेच कर्मचारी - अधिकारी त्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा आनंद घेत होते.
* दीर्घ प्रतीक्षेनंतर लस मिळाल्याचा आनंद
डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूसोबत मागील अनेक महिन्यांपासून आपण लढा देत आहाेत. त्यात डॉक्टर, अधिकारी, सफाई कर्मचारी - परिचारिका असे अनेक घटक अहोरात्र अविरतपणे काम करत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज लसीकरणात प्राधान्य मिळाल्याचा आनंद आहे. शिवाय, पालिकेच्या रुग्णालयातही लसीकरणासाठी उत्तम व्यवस्थापन आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत, हेही कौतुकास्पद आहे.
* आधी भीती, आता समाधान
गेली १२ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे. मात्र कोरोनाकाळ हा सर्वाधिक खडतर होता. या काळात आमच्यासारख्या सेविकांनी मोलाचे योगदान दिले. बऱ्याच कुटुंबामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला तर काहींनी आपली माणसे गमावली. मात्र इतक्या कठीण वेळेनंतर आज लसीकरणाचा दिवस उजाडला. आरोग्यसेवा क्षेत्रातील तसा कनिष्ठ घटक असूनही पहिल्याच दिवशी लस मिळाली याचा आनंद आहे. लस घेण्यापूर्वी भीती वाटत होती, परंतु डोस घेतल्यानंतर अत्यंतिक समाधान वाटत आहे.
- रुपाली शिंदे, अंगणवाडी सेविका
* मेहनतीच फळ
कोरोनाच्या तीव्र संक्रमणाच्या १० महिन्यांच्या काळात अंगणवाडी सेविकांनीही काम केले. शिवाय, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेसाठी आमचा प्राधान्याने विचार करण्यात आला, त्याची अंमलबजावणी झाली यावर अजूनही विश्वास बसत नाही. डोस घेतल्यानंतर दीर्घ काळ केलेल्या मेहनतीच फळ मिळाल्याची भावना आहे.
- श्वेता कोठारकर, अंगणवाडी सेविका
* लसीकरण प्रक्रिया सुरळीत
मुंबई कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे आजचा लसीकरणाचा क्षणही नायर रुग्णालयाच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टिकोनातून यशाची मोहोरच होता. आजची लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडली असून कुणालाही कोणताही दुष्परिणाम झालेला नाही.
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय
* सेल्फी, स्टेटसची लगबग
लसीकरण कक्ष, लसीकरणासाठी असलेला नोंदणी क्रमांक, लसीकरण, असे सर्व क्षण टिपण्यासाठी सर्वत्र लगबग दिसून आली. लसीकरण कक्षात कुणी सेल्फी घेत होते, तर कुणी चक्क लसीकरण कक्षातील कर्मचारी - डॉक्टरांच्याच हाती मोबाईल देऊन फोटो काढता का, असे विचारून हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपडत हाेते.
........................