- मनीषा म्हात्रेमुंबई : सकाळी अचानक जोराचा हादरा बसला. भूकंप झाल्याचे समजून पत्नीसह बाहेरच्या खोलीत धाव घेतली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही लॉक झाल्याने बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. देवाचा धावा सुरू केला. चहूबाजूंनी धुरळा उडाला. काही समजण्याच्या आतच, पत्त्यांच्या घरांप्रमाणे एक मजला खाली कोसळला. घरातील बेडशीटची दोरी बनवत खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करणार तोच अग्निशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारातून सुखरूप काढल्याचे डोळ्यांत पाणी आलेल्या मनन नरिया यांनी सांगितले.
प्रशांत निवास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मनन नरिया व त्यांचे कुटुंबीय राहत होते. ते म्हणाले, सकाळी साडेनऊच्या सुमारास मी आणि पत्नी आतल्या खोलीत गप्पा मारत असतानाच, अचानक जोराचा आवाज होत हादरा बसला. आम्ही आई-वडिलांसोबत बाहेरच्या खोलीत आलो अन् काही क्षणांत पत्त्यांच्या घरांप्रमाणे आम्ही एक मजला खाली कोसळलो. बाहेरून किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज कानावर पडत होता. इमारत खचल्यामुळे दरवाजाही लॉक झाला. अखेर चादर, साडीची दोरी बनवत खिडकीच्या साहाय्याने खाली उतरण्याचे ठरवले. त्यानुसार, प्रयत्नही सुरू केले व त्याचदरम्यान अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याचे मनन म्हणाले.
उरला फक्त मोडकातोडका संसार... सोमवारी - दुसऱ्या दिवशी अर्धवट कोसळलेली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. याच, ढिगाऱ्याखालून आपल्या मोडक्यातोडक्या संसाराकडे पाहून नरिया यांना अश्रू अनावर झालेले दिसून आले. त्यातूनच हाती काही लागते का, यासाठी त्यांची धडपड सुरू होती.