मुंबई - दसरा मेळाव्यातील शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील भाषणांचा आता चांगलीच चर्चा रंगली आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांची भाषणं फेल गेल्याचं राजकीय समिक्षक सांगतात. मात्र, शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणांना या सभा गाजवल्या. गुलाबराव पाटलांनी उद्दव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही वारसदार नाही पण हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आमच्या ४० जणांची नावं आहेत, असं ठणकावून सांगितले. तसेच, भविष्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभेवर भगवा फडकेल, असेही ते म्हणाले.
गुलाबरावांनी भाषणाच्या सुरुवातील शिवसेनेतील संघर्षाची आठवण करुन दिली. गेल्या ३५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईत येतोय. सकाळी रेल्वे पकडून मुंबईत दादरला उतरायचं. सुलभ शौचालयात अंघोळ करायची, त्यानंतर २ वडापाव खाऊन गेट वे ऑफ इंडियाला फिरायला जायचं आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार ऐकायला, त्यांना पाहायला दसरा मेळाव्याला जायचं. गेल्या ३५ वर्षांत आमच्या गावी दसरा कसा होतो, हेही आम्हाला माहिती नाही, असे म्हणत शिवसैनिक म्हणून आपण दसरा मेळाव्याला दरवर्षी मुंबईत येत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
शिवसैनिक झाल्यानंतर पहिलं चांगलं काम कोणतं झालं तर ते १५ दिवसांत पोलिसांनी तुरुंगात टाकलं. १५ दिवस मी तुरुगांत होतं. त्यानंतर, १९९२ दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप असे चारजण एकाच बरॅकमध्ये तुरुंगात होतो. कन्हैय्या बंधुंना कोठडीतच मारलं गेलं, या दोन भावांचा खून केला गेला. या सर्वांच्या भरोशावरच ही शिवेसना वाढली आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेसाठी केलेल्या संघर्षाची कहाणीच सांगितली.
आम्ही आमची आमदारकी आणि मंत्रीपदं सोडली, मला अगोदरही पाणीपुरवठा मंत्रीपदच होतं, आजही तेच आहे. मग का सोडलं होतं मी. कारण, बाळासाहेबांच्या विचारांपासून आम्ही दूर जातोय, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला, पद गेलं तरी चालेत पण तत्त्वाशी तडजोड करणार नाही. त्यामुळेच, आम्ही एकनाथ शिंदेंना साथ दिली, असे गुलाबराव यांनी बीकेसीतील सभेत बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून येथे लोकं आली आहेत. शिवाजी पार्कवरही सभा सुरू आहे, पण येथील सभेत स्वर्गीय बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांचा आत्मा आहे. तो आज एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देतोय, कारण या महाराष्ट्रावर भगवा फडकून एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न आज तुम्ही पूर्ण केलंय, असेही ते म्हणाले.