Join us

"नाचणारी बाई तर पाहिजे, पण..."; गौतमी 'पाटील' वादावर शाहीर भगत यांचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 3:28 PM

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे

मुंबई - लोकप्रिय आणि वादग्रस्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या आडनावावरुन आता वाद सुरू झाला आहे. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव न लावण्याचा भूमिका काही लोकांनी घेतली होती. त्यास, अनेकांनी समर्थन केलं. तर, मी पाटील आहे, मी हे आडनाव लावणारच अशी भूमिका गौतमीने स्पष्ट केली आहे. त्यावरुन, आता गौतमी समर्थक आणि विरोधक शाब्दीक युद्धात भिडले आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या गौतमीच्या पाटील आडनावाचं समर्थन केलं आहे. तर, प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांनीही फेसबुक पोस्टमधून या वादावर मत मांडलंय. 

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यावरुन, आता वेगळाच वाद सुरू झाला असून सुषमा अंधारे आणि संभाजी भगत यांनी पाटील आडनाव लावण्याचं समर्थन केलंय. मात्र, भगत यांनी कुठेही गौतमीचं नाव घेतलं नाही. पण, ''या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही. मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही?'', असे म्हणत संभाजी भगत यांनी गौतमी ''पाटील'' वादावर सोशल मीडियातून भाष्य केलंय. 

संभाजी भगत यांची फेसबुक पोस्ट

"नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण... ती आपल्यापेक्षा खालच्या जातीची पाहिजे... नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये. आजपर्यंत ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्यातला जात्यंध पुरुष दुखावतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे. पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही. मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत?"

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे. भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच, पण ते जात्यंधसुद्धा आहेत. म्हणून बलात्कारित स्त्रीकडेसुद्धा ते अशाच घाणेरड्या पद्धतीने बघतात. तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात. दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्यापेक्षा खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात. बलात्कार हे हत्यार म्हणूनसुद्धा वापरतात".  

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!

 

टॅग्स :गौतमी पाटीलसुषमा अंधारेसोशल मीडिया