Join us  

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील?; शहाजीबापू पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:03 PM

आम्ही शिवसेनेशी फारकत घेणार नाही, असं शहाजीबापू यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

मुंबई- शिवसेनेत बंड केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेवढे प्रकाशझोतात आले, त्यापेक्षा अधिक शिंदे गटातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आले ते त्यांच्या अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील संवादामुळे. त्यांनी आता एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही, यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का?, असा प्रश्न बीबीसी मराठीच्या मुलाखतीत शहाजीबापूंना विचारण्यात आला. यावर या प्रश्नाचं उत्तर आपण नाही पण म्हणू शकत नाही. २५ वर्षं त्यांनी एकमेकांसोबत काम केलंय. ते एकमेकांचे शत्रू नाहीत. हा परिस्थितीचा निर्णय आहे. सत्तेचा नाही. उद्धव ठाकरे वेळोवेळी टप्प्याने विचार करतील आणि संपूर्ण शिवसेना भविष्यात एकजुटीने काम करेल, असा विश्वास शहाजीबापू पाटलांनी यावेळी व्यक्त केला. 

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं १०० टक्के आम्हाला वाटतं, आणि का वाटू नये? उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सर्व आमदारांच्या काळजात आहेत, असं शहाजीबापू यांनी सांगितलं. तसेच आम्ही शिवसेनेत आहोत, कालही होतो आणि उद्याही शिवसेनेतच असणार. आम्ही शिवसेनेशी फारकत घेणार नाही, असं शहाजीबापू यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भुमिका होती की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना पांठीबा द्यावा. आम्ही देखील त्यांना आधीच पाठींबा दिलेला आहे. एका आदीवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी जी आता भुमिका घेतली आहे, ती भुमिका ही अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.  

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना