Join us  

CoronavirusNews: 'उद्धव ठाकरेंच्या कामाचं आम्हीच कौतुक करत होतो, आता सगळं वाया गेलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 8:47 AM

औरंगाबाद शहरात जर दारुविक्री सुरु केली, तर आम्ही लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरू, असा इशाराच जलील यांनी दिला होता. तसेच, राज्य सराकरवर टीका करताना,

मुंबई - राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारनं दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिली. राज्य सरकारच्या या मागणीला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला होता. औरंगाबाद हे सध्या रेड झोनमध्ये असल्याने येथे दारूविक्री बंदच राहावी, अशी मागणी जलील यांनी केली होती. त्यातच, सोमवारी राज्यातील सर्वच ठिकाणी दारुसाठीच्या रांगा आणि गर्दी पाहून सरकारने दारुविक्री कायम ठेवली. त्यानंतर, माझं म्हणणं मुंबईकरांना पटलं, असे म्हणत जलील यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

औरंगाबाद शहरात जर दारुविक्री सुरु केली, तर आम्ही लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरू, असा इशाराच जलील यांनी दिला होता. तसेच, राज्य सराकरवर टीका करताना, आम्हाला सरकारच्या कामाची लाज वाटते असेही त्यांनी म्हटले. दारु विकत घेणाऱ्यांचे रेशनकार्ड सरकारने रद्द करावे, जर ते दारु विकत घेऊ शकतात. तर ते अन्नधान्यही विकत घेऊ शकतात, असे म्हणत मद्यपींवर जलील यांनी टीका केली होती. आम्ही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं होतं, पण आता सगळं वाया गेलं. इतरही रेडझोनमधील आमदार, खासदार गप्प का? या मृत्युच्या खेळाबाबत ते बोलत का नाहीत, असा सवालही जलील यानी विचारला आहे. दरम्यान, खासदार जलील यांनी लॉकडाऊनचे निमय मोडण्याची भाषा केल्याने, भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी जलील यांच्यावर टीका केली. एका खासदाराला अशी नियम मोडण्याची भाषा शोभते का, असा सवाल कराड यांनी विचारला.   

दरम्यान, सध्या रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू आहेत. मात्र आता त्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश होतो. मात्र अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू असताना काही नियम पाळावे लागणार आहेत. एका लेनमधील केवळ पाचच दुकानं सुरू राहू शकतात. मद्यविक्री करणारी दुकानं सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी अद्याप स्पा, सलून, पार्लर याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात दारुविक्रीला परवानगी दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

दारुविक्रीला परवानगी देण्याची ही योग्य वेळ नाही. रेड झोन असलेल्या औरंगाबादमध्ये सरकारने दारुची दुकाने उघडल्यास आम्ही सक्तीने ही दुकाने बंद पाडू. प्रसंगी लॉकडाऊनचे सर्व नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतरू, यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश दिसेल, असेही जलील यांनी म्हटले. तसेच, कुटुंबातील माता-भगिनींना या दारुविक्रीमुळे त्रास होऊ शकतो, असे म्हणत कौटुंबीक हिंसाचाराकडेही जलील यांनी लक्ष वेधले होते. 

टॅग्स :उद्धव ठाकरेइम्तियाज जलीलमुंबईदारूबंदीकोरोना वायरस बातम्या