Join us

बाळांना दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का?; आरोग्य समिती अध्यक्षांचा उलटा जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 7:16 PM

विभागातील निष्काळजीमुळे चार बालकांचा मृत्यू झाला असून तीन बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचा आरोप त्यांनी केला. 

मुंबई- भांडुपच्या महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये एनआयसीयूमध्ये चार बालकांचा मृत्यू झाला होता. ११ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलमध्ये वातानुकुलित यंत्र होतं. ते यंत्र बिघडलं त्यामुळे शॉर्टसर्किट झाला आणि तीन दिवस यांसंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे २० ते २२ डिसेंबर रोजी तीन बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच आज चौथ्या बालकाचा मृत्यू झाला, असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सदर घटनेचे पडसाद देखील आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उमटले.

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील नवजात शिशु अति दक्षता विभाग चालविण्याचे कंत्राट वैद्यकीय क्षेत्रातील खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या विभागातील प्रत्येक खाटेसाठी महापालिका प्रतिदिन ३७५० रुपये संबंधित कंपनीला देत आहे. या कंपनीला तीन वर्षांसाठी आठ कोटी २१ लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. तरीही येथे डॉक्टर, परिचारिका उपलब्ध नाहीत व अन्य गैरसोयींबाबत स्थानिक नगरसेविकेने पालिका प्रशासनकडे तक्रार केली होती. 

भांडुप स्थानक, एल.बी.एस. मार्ग येथील या प्रसूतिगृहात नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी सन २०१६ पासून सर्व आवश्यक साधन तयार ठेवण्यात आली होती. मात्र डॉक्टर व परिचारिका उपलब्ध होत नसल्याने हा विभाग सुरु होऊ शकला नाही. अखेर खासगी संस्थेच्या माध्यमातून हा विभाग चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मे २०२१ मध्ये हा विभाग चालविण्याचे कंत्राट इंडियन पेडिऍट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी २० खाटांचा हा विभाग सुरु करण्यात आला. 

मात्र या विभागात शौचालय, पिण्याच्या पाण्याची समस्या, तसेच वेळेत डॉक्टर, परिचारिका उपलब्ध होत नसल्याबाबत वेळोवेळी विभाग कार्यालयाचे लक्ष वेधले होते. मात्र कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही, अशी नाराजी स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी व्यक्त केली. या विभागातील निष्काळजीमुळे चार बालकांचा मृत्यू झाला असून तीन बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचा आरोप त्यांनी केला. 

ऍडमिट करताना आम्हाला विचारलं होतं का?- आरोग्य समिती अध्यक्ष

सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल या गुरुवारी संध्याकाळी भांडुप प्रसूतिगृहाची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या. मात्र तिथे प्रसूतिगृहाबाहेर ठिय्या मांडणाऱ्या स्थानिक रहिवाशी व बालकांच्या नातेवाईकांनी अध्यक्षांना जाब विचारत दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी डॉक्टर मिळत नाहीत. येथे दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का?, असा उलटा जाब रहिवाशांनाच पटेल यांनी विचारला. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले-

भांडुपच्या महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये एनआयसीयूमध्ये चार बालकांचा मृत्यू झाला होता. ११ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलमध्ये वातानुकुलित यंत्र होतं. ते यंत्र बिघडलं त्यामुळे शॉर्टसर्किट झाला आणि तीन दिवस यांसंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे २० ते २२ डिसेंबर रोजी तीन बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच आज चौथ्या बालकाचा मृत्यू झालाय. बालकांच्या मृत्यूकरीता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहीजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामृत्यूहॉस्पिटल