आम्ही नशेत होतो, काय घडले ते आठवत नाही
खार हत्याप्रकरण : संशयितांची पोलिसांना माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खारमध्ये जान्हवी कुकरेजा (१९) या विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पाेलिसांनी श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र नशेत असल्याने त्या रात्री काय घडले याबाबत काहीच आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत श्री व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. हे दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवती हाईट्स इमारतीच्या टेरेसवर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरू असलेल्या पार्टीत जवळपास १२ जण होते. श्री हा अन्य मुलींच्या जवळ जात होता हे जान्हवीला आवडत नव्हते. त्यातच तिने त्याला दियासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.
याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी तिला बेदम मारहाण केली. केसांना धरून शिड्यांवरून फरफटत नेले, अशी माहिती आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, जान्हवीचे डोके रेलिंगला जोरात आपटल्याने तिच्या कवटीला दुखापत झाली आणि वेळेत उपचार मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मारहाणीनंतर दिया आणि श्री हे उपचारासाठी वेगवेगळ्या दवाखान्यांत निघून गेले.
* ...तर माझी मुलगी वाचली असती
जान्हवीचे मित्र तिला पार्टीसाठी घेऊन गेले आणि ५ वाजता मला तिच्या मृत्यूची बातमी समजली. तिने सव्वादोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, तोपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. पण, एकानेही याबाबत आम्हाला कळविले नाही. वेळेत उपचार मिळाले असते तर माझी मुलगी वाचली असती. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची तयारी करणारी माझी मुलगी आम्हाला कायमची सोडून गेली, असे जान्हवीची आई निधी कुकरेजा यांनी खार पोलीस ठाण्याजवळ रडतच सांगितले.
.............................