Join us

...म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश करतोय; नितेश राणेंवर टीका करत नगसेवकांनी सांगितलं राजकारण

By मुकेश चव्हाण | Published: February 09, 2021 2:55 PM

नगरपरिषद ही पहिल्यांदा झाली होती. पण तिचा विकास नितेश राणे करू शकले नाही, अशी टीकाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी दिली आहे. 

मुंबई/सिंधुदुर्ग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाला वैभववाडीत शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपा नगरसेवक फुटल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे सोमवारपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

गेल्या 5 वर्षांपासून नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. गेल्या 5 वर्षांत नितेश राणेंनी काही आश्वासनं दिली होती. ती पूर्ण केली नाही. तसेच त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. नगरपरिषद ही पहिल्यांदा झाली होती. पण तिचा विकास नितेश राणे करू शकले नाही, अशी टीकाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी दिली आहे. 

शिवसेना आमचं जुनं प्रेम- नितेश राणे

नितेश राणेंनीही ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चिमटा काढला आहे.  वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हेंलेनटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही, असं नितेश राणे यांनी सांगितले. 

येणाऱ्या निवडणुकीत कोणी उमेदवार भेटणार नाहीत. शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नये अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे 7 नगरसेवक व्हेलेंनटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. 

नारायण राणे मैदान सोडणार नाहीत, याची खातरजमा करून घ्यावी

अमित शहा यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा अमित शहा यांनी करून घ्यावी असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला होता.  तसेच राणेंना कितीही ताकद दिली तरी पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा पराभूत करून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला, त्याचसोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख महाराष्ट्राचे दबंग नेते असा केला होता. मात्र या दबंग नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी वर्षभर का ताटकळत का ठेवले, असा सवाल वैभव नाईक यांनी फडणवीस आणि भाजपाला विचारला आहे.

टॅग्स :नीतेश राणे सिंधुदुर्गभाजपाशिवसेनापोलिसउद्धव ठाकरे