आपल्याला ‘आंतरराष्ट्रीय’ होण्याची घाई झालीये! म्हणूनच इंग्रजी भाषेला डोक्यावर घेतले आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 05:32 PM2017-09-18T17:32:14+5:302017-09-18T17:32:36+5:30
मुलांना इंग्रजी माध्यमात घालून आम्ही त्यांना घरी मराठी शिकवू ही भूमिका फसवी असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल असा सूर मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठकीत उमटला.
- दत्ता पाटील
मुलांना इंग्रजी माध्यमात घालून आम्ही त्यांना घरी मराठी शिकवू ही भूमिका फसवी असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल असा सूर मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठकीत उमटला. मुंबईतील 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी नरे पार्क ( परळ ) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठक मालाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर या शाळेत पालकांच्या मोठ्या उत्साहात पार पडली.
मुळातच आपल्याला फार लवकर ‘जागतिक’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय’ होण्याची घाई झालीये. म्हणूनच इंग्रजी भाषेला डोक्यावर घेऊन केवळ कमरेचं झाकण्याएवढी अस्मिता औषधाला असावी म्हणून ‘मराठी’ बाकी ठेवण्याचा आपल्या राज्यकर्त्यांचा डाव आहे आणि त्यांना ‘यू आर नेव्हर रॉँग’ म्हणून प्रतिसाद देणारी आजची नवी गाफील जनताही कारणीभूत आहे. मातृभाषातून दिले जाणारे शिक्षण श्रेष्ठ असल्याचे तज्ज्ञांनी सिद्ध करूनही आपण ‘पाश्चात्त्यप्रेमा’च्या सुरस मनोरंजक विश्वातून बाहेर पडू इच्छित नाही.
यापुढे ते म्हणाले, आता तर आपण इतके कर्मदरिद्री होत चाललोय, की मराठी शाळा बंद करून तिथे सरसकट इंग्रजी शाळा चालू करण्यासाठी सज्ज झालो आहोत. चीन, जपान आणि जर्मनीताल लोकांपेक्षा आपलं इंग्रजी चांगलं असल्याचा आपल्याला वृथा अभिमान आहे. मुळातच गुलामगिरीची मानसिकता काही केल्या आपला पिच्छा सोडत नाही. स्वातंत्र्यानंतर इंग्रजी अधिक वेगानं घराघरात घुसली. शहरातल्या आईबाबांचं ‘पप्पा-मम्मी किंवा डॅड-ममा’मध्ये रूपांतर होणं सुरू झालं आणि नीमशहरी, ग्रामीण भागालाही त्वरित त्यासारखेच इंटरनॅशनल होण्याचे डोहाळे लागून बहुजनांचे लुगडे, धोतरातले, मातीतले, रांगडे खंदे मायबापही ‘पप्पा-मम्मी’च्या झिरमिळ्यांनी बावळट वाटू लागले.
आज आपल्या मराठी मुलांवर वयाच्या तिस-या वर्षापासूनच जिंगल बेल काय, सांताक्लॉज काय, वन अ पेनी टू अ पेनी काय, स्नो असा मारा सुरू होतोय. ज्या गोष्टींचा आपल्या संस्कृतीशी, भौगोलिकतेशी, जीवनशैलीशी सुतराम संबंध नाही, त्यापासूनच पायाभरणी केल्यावर मराठी भाषेचे अस्तित्व लयास गेले तर नवल नको. एका बाजूला म्हसोबा, आयामाउल्यांच्या शेंदरी दगडांपुढे अजूनही अगरबत्त्या लावून नारळ फोडणारे आई-बाप आणि शाळेतून स्नो, पाईन, सांताक्लॉज, पेनी वगैरे अनाकलनीय बाबी शिकून आलेली त्यांची बावळट गोंधळलेली कथित इंटरनॅशनल पोरं हा विरोधाभास जोडायचा कसा? म्हणूनच मराठी शाळा बंद करून इंग्रजीकरण करणं म्हणजे पाश्चात्त्यांची पुन्हा गुलामगिरी ओढवून घेणं होय.
(लेखक हे नाट्य आणि चित्रपटलेखक आहेत.)