मुंबई: मुंबईतील चाकरमान्यांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी अखेर सुरू करण्यात आली. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्या आहेत. याबाबत मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या मुंबई हळूहळू पूर्ववत होत आहे. तसेच लोकांचं हित आणि गरज पाहून सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याचदरम्यान, कोरोनानंतर आता लवकरच मुंबईत नाईट लाईफ देखील लवकरच सुरु होणार आहे, अशी माहिती मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसेच अद्याप कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. याच धर्तीवर मुंबईतील नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केलं आहे.
दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडे झाले असले तरी रेल्वे स्थानकांच्या तिकीट घरांवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या प्रवाशांना रांगा लावूनही वेळेत तिकीट मिळालं नाही त्या प्रवाशांनी मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. एकतर प्रवास करायला वेळेची अट व दुसरीकडे प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे पहिल्या दिवसाच्या लोकल प्रवासावर एकप्रकारे विरजण पडल्याचे पाहायला मिळालं.
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका-
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालंय. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी नाराजी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.