मुंबईः विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट आणि एका पोर्टलची बातमी व्हायरल झाली आहे. त्यावरून आज विधानसभेत गोंधळ झाला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरून भाजपचे आमदार संतप्त झाले. त्यानंतर, नाना पटोलेंनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी या आक्षेपार्ह पोस्टवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं.
"चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना कशाबाबतही जेलमध्ये टाकलं जातं. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अद्याप कारवाई केली नाही. मी काय आहे जगाला माहिती आहे.", असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.
त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्या कार्यकर्त्याला आजच अटक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.