आम्ही साक्षर होणार ‘उल्लासा’त!
By सीमा महांगडे | Updated: January 21, 2025 07:21 IST2025-01-21T07:21:04+5:302025-01-21T07:21:22+5:30
शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून देशात सध्या प्रौढ साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत राज्यात आठ लाख निरक्षरांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आम्ही साक्षर होणार ‘उल्लासा’त!
- सीमा महांगडे
मुंबई - शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून देशात सध्या प्रौढ साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत राज्यात आठ लाख निरक्षरांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या उल्लास ॲपवर आतापर्यंत ५ लाख २३ हजार ७९८ निरक्षरांनी साक्षर होण्यासाठी नावनोंदणी केल्याचे आता समोर आले आहे शिवाय स्वयंसेवक म्हणून ११ जानेवारीपर्यंत तब्बल १ लाख २१ हजार २३७ तरुणांची नोंदणी झाली आहे.
या आधी ज्यांनी शाळा कधी पाहिलीच नाही, अशा हजारो निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्राकडून उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमाच्या शेवटी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची मूल्यमापन चाचणी घेण्यात येते. त्यासाठी वर्षभर स्वयंसेवकांद्वारे निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख आणि व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येते. यंदा या ‘उल्लास’ कार्यक्रमात प्रौढांना मोफत शिकविण्यासाठी ५७ हजार ७३३ स्वयंसेवकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असताना सव्वा लाख त्यासाठी मोफत सेवा देण्यासाठी पुढाकार नोंदविला. राज्यातील शिक्षित तरुणांनी अशिक्षितांसाठी दाखविलेला हा ‘उल्हास’ चर्चेचा विषय ठरला आहे.
६,२१,४६२ निरक्षरांची नाेंदणी
मागील वर्षी सुरू झालेल्या या उपक्रमात ६ लाख २१ हजार ४६२ प्रौढ निरक्षरांची नोंदणी आणि परीक्षा झाली होती.
यंदा राज्याला ८ लाखाहून अधिक निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्याने यंदा आघाडी घेतली असून जिल्ह्याने १७४३ प्रौढ निरक्षर नोंदणीचे उद्दिष्ट पार करत ८ हजार ४१५ प्रौढांची नोंद केली आहे.
येथे फक्त १७४ स्वयंसेवकांचे उद्दिष्ट असताना तब्बल १३१३ तरुणांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे या आदिवासीबहुल जिल्ह्याने महाराष्ट्रात पहिले स्थान पटकावले आहे.
मागील वर्षी ६ लक्ष ६० हजार एवढी निरक्षर प्रौढांची नोंदणी होऊन त्यापैकी ४ लाख ५९ हजार उल्लास परीक्षेत बसले होते. त्यातील ४ लाख २५ हजार साक्षर झाले. चालू वर्षासाठी ५ लाख ७७ हजार इतक्या निरक्षरांच्या ऑनलाइन नोंदणीचे उद्दिष्ट आहे. ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी लगतच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेकडे त्वरित नोंदणी करावी.
- राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक, उल्लास
यंदा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मागच्या वेळी नोंदणी केलेले, मात्र परीक्षा न देऊ शकलेले यंदा परीक्षा देऊ शकतील. त्यामुळे राज्यातील साक्षरतेचे प्रमाण टप्प्या-टप्याने का होईना वाढत आहे.
- महेश पालकर, संचालक, योजना शिक्षण संचनालय