अंधेरी, जुहूसह तीन ठिकाणे बॉम्बने उडवू; पोलीस हेल्पलाइनवर धमकीचा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 09:10 AM2022-10-20T09:10:52+5:302022-10-20T09:11:18+5:30
निनावी कॉल्स बनताहेत डोकेदुखी
अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर मंगळवारी रात्री आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसली तरी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री साडे दहा वाजता मुंबई पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ वर कॉल करत मुंबईमध्ये तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. ज्यात अंधेरी येथील इनफिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल विमानतळ याचा समावेश असल्याचेही कॉलरने सांगितले. या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातच सणासुदीचे दिवस असल्यामुळे मुंबईत फिरायला येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी सहारा हॉटेल विमानतळ, जुहू, अंबोली, बांगूर नगर पोलीस, सीआयसीएफ यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या मदतीने सर्व परिसर पिंजून काढला. ज्यात कोणतीही संशयास्पद वस्तू मिळालेली नाही.
निनावी कॉल्स बनताहेत डोकेदुखी
पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच फोन करणाऱ्यांचा शोध सुरू असून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सणांच्या दिवसात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.