मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे

By मनोहर कुंभेजकर | Published: September 20, 2024 11:27 PM2024-09-20T23:27:55+5:302024-09-20T23:28:18+5:30

कांदिवली पूर्व अशोक नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

We Will bring millions of people away from Mumbai back to Mumbai by giving them their rightful home said Srikant Shinde | मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे

मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे

मनोहर कुंभेजकर, मुंबई: रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील अडचणी दूर झाल्याने घरांचा प्रश्न मार्गी लागेल आणि मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू, अशी ग्वाही शिंदे सेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी आज उत्तर-पश्चिम आणि उत्तर मुंबईमधील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी कांदिवली पूर्व अशोक नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे,मागाठाणेचे शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे,शिंदे सेनेचे सचिव सिद्धेश कदम,शिंदे सेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे,प्रवक्ते किरण पावसकर,प्रवक्त्या शीतल म्हात्रे,महिला विभाग संघटक मीना पांनमद आदी मान्यवर उपस्थित होते.
  
खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, मागाठाणेमध्ये घरांचा प्रश्न मोठा असून येथे ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’ने एकत्रपणे योजना सुरु केली आहे. तसेच एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार आहे. मागील काही वर्षात एसआरएमध्ये भ्रष्टाचार झाला, काहीजण तुरुंगात आहेत तर अनेक बिल्डर फरार आहेत. यामुळे ⁠लोकांना त्यांची हक्काची घरे मिळाली नाहीत. या प्रकल्पांची जबाबदारी सरकारने घेतली असून लाखो मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देऊ. आतापर्यंत सरकारने २२७ एसआरए प्रकल्प मार्गी लावले आहेत.  मराठी माणसाला मुंबईत परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. गेली अनेक वर्षे ज्यांनी मुंबईत सत्ता गाजवली त्यांनी मात्र मुंबईकरांसाठी काहीच केले नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठावर केली.
  
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसेनेची सध्या राज्यभर जनसंवाद यात्रा सुरु आहे. पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीने ⁠कार्यकर्ते, पदाधिकारी, शाखाप्रमुखांशी चर्चा करणे तसेच ⁠सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का,याचाही यात आढावा घेण्यात येत आहे. शिंदे सेना घोडदौड करत असून विधानसभेत जास्तीत जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यश मिळाले आहे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत ३ कोटी बहिणी या योजनेचा लाभ घेतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत १ कोटी ६० लाख बहिणींना पैसे मिळालेत. ⁠ज्यांनी उशीरा अर्ज केला त्यांना एकत्रित ४ हजार ५०० रुपये मिळतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

मविआत सर्वांनाच मुख्यमंत्री बनायचंय
 
काही लोकं मला मुख्यमंत्री करा, असं बोलत फिरत असल्याचा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठाचे नाव न घेता लगावला. त्यांना रोज खोक्यांशिवाय काही दिसत नाही. ज्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढले त्यांच काँग्रसेच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात अशी टीकाही त्यांनी उबाठावर केली. महाविकास आघाडीमध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री बनायचे आहे असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: We Will bring millions of people away from Mumbai back to Mumbai by giving them their rightful home said Srikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.