लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर मुंबईत इतके मोठे रुग्णालय उभारू की इथल्या रहिवाशांना बाहेर उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. उलट बाहेरून रुग्ण उपचारासाठी येतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिली.गोयल यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. निवडून आल्यानंतर उत्तर मुंबईतील कुठली समस्या प्राधान्याने सोडवाल, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयाची गरज अधोरेखित केली. लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या विविध प्रश्नांपासून ते केंद्रीय मंत्री म्हणून बजावलेल्या कामगिरी विषयीच्या प्रश्नांना गोयल सामोरे गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन पीयूष गोयल म्हणाले, देशातील जनतेच्या रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात मोदी सरकारला यश आले आहे. आता शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या आरोग्याच्या विविध योजना पाहता देशात युनिव्हर्सल ‘हेल्थ केअर सिस्टीम’ उभी राहत आहे.
आयआयटींच्या निराशाजनक प्लेसमेंट रिपोर्टचा हवाला देत देशातील रोजगार संधीविषयी विचारले असता, ते म्हणाले, ही आकडेवारी तपासून घ्यावी लागेल. कारण, देशभर रोजगाराच्या संधी वाढलेल्या दिसून येतात. अनेक राज्यांत कौशल्यपूर्ण मनुष्यबळाला खूप मागणी आहे. एआय, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर, मशीन लर्निंग या क्षेत्रातील रोजगारसंधी वाढल्या आहेत. मोदींनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले.
रेल्वेमंत्री असताना मुंबईतील रेल्वे वाहतूक सुधारण्याचा आपण खूप प्रयत्न केला. आपल्या काळात मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांचा कायापालट झाला. स्थानकांवर नियमित स्वच्छता होऊ लागली. शौचालयांची संख्या वाढली. मोठ्या संख्येने पूल बांधले गेले. लिफ्ट, सरकते जिने आले. एसी रेल्वे आपण सर्वप्रथम आणली. भविष्यात मुंबईतील सर्व लोकल एसी चालविण्याचा विचार आहे, अशा शब्दांत त्यांनी रेल्वेमंत्री असताना मुंबईकरिता दिलेल्या योगदानाविषयी सांगितले.
उद्धव यांनी कामे थांबविलीमुंबईच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, मुंबईच्या विकासाचा विचार सर्वसमावेशक दृष्टिकोनातून केला गेला पाहिजे. त्यात विकास योजनांच्या आखणीपासून वित्त पुरवठ्यापर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश होतो. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने मुंबईला बरेच काही दिले. गेली ३०-३५ वर्षे अटल सेतू हा फक्त कागदावरच होता. त्याला मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी आकार दिला. मुंबई मेट्रोचा विस्तारही भाजपाच्या काळात झाला. ठाकरे यांनी वादामुळे कामे थांबविण्याचा प्रयत्न केला.
धारावी पुनर्विकास, जमीन देण्याचा निर्णय माझा धारावी पुनर्विकासाकरिता रेल्वेची जमीन देण्याची कल्पना मीच मांडली होती. तसेच, तो निर्णयही मीच घेतला होता. धारावीकरांचा विकास त्याच ठिकाणी होईल. त्यांना त्याच ठिकाणी घर मिळेल. मुंबईत अनेक झोपु योजना प्रलंबित आहेत. रहिवाशांनी एकत्र येऊन गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून या योजना मार्गी लावाव्यात, यासाठी आपला प्रयत्न आहे. ज्या योजना रखडल्या आहेत, त्या सीएसआर किंवा देणगीच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा विचार आहे.