मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उत्तर प्रदेशात भव्य उद्यान उभारणार असल्याची घोषणा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केली. सायन येथील सोमैय्या मैदानात आयोजित महारॅलीला ते संबोधित करत होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी समाजवादी पार्टीने कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत 'देश बचाओ, देश बनाओ' या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्या वेळी अखिलेश म्हणाले की, नोटाबंदीमुळे दहशतवादाल आळा बसणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. मात्र, अजूनही दहशतवादाची समस्या तशीच आहे. मग मोदी आता पुन्हा नोटाबंदी करणार का, असा सवाल करतानाच नोटांचा रंग बदलून भ्रष्टाचार मिटत नसतो, असा टोलाही अखिलेश यादव यांनी लगावला.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हीएम)वर यादव यांनी या वेळी शंका उपस्थित केली. मुंबईतील सभेपूर्वी रविवारी दुपारी वाराणासीत अखिलेश यांची सभा होती. त्यानंतर, संध्याकाळी 5 वाजता ते मुंबईतील सभेला संबोधित करणार होते. मात्र, वाराणासीतून मुंबईत दाखल होण्यास अखिलेश यांना विलंब झाला. त्यामुळे सोमैय्या मैदानावर सभेसाठी जमलेल्या सपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व हाणामारीच्या घटना घडल्या.