Join us

विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर प्राधान्याने पूर्ण करू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 2:33 AM

नगरविकासमंत्री शिंदे यांची घोषणा : ‘फ्रीवे’चा होणार विस्तार; ठाणे कोस्टल रोडचे काम एमएमआरडीएमार्फत

मुंबई : विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरचे काम राज्य सरकार प्राधान्याने हाती घेणार आहे. यामुळे पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील वाहतूककोंडी फोडण्याबरोबरच आर्थिक विकासाला गती मिळेल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते एमएमआरडीएच्या आढावा बैठकीत बुधवारी बोलत होते. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरसाठी १०४ पैकी ५५ गावांमध्ये जॉइंट मेजरमेंट सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात येणार असून, त्याचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण केले जाणार आहे.

मेट्रो प्रकल्प वेळेआधीचमुंबईत एमएमआरडीएच्या माध्यमातून १२ मेट्रो मार्गांचे नियोजन असून, त्यापैकी सहा मार्गिकांची कामे सुरू आहेत. अखेरच्या मार्गिकेचे काम २०२६ मध्ये पूर्ण होण्याचे नियोजन आहे; परंतु या कामांना गती देऊन वेळापत्रकापूर्वी पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. मार्ग क्र. ८ हा मुंबई व नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणारा मार्ग २०२६ च्या आधीच पूर्ण होणे गरजेचे आहे. नवी मुंबई येथील विमानतळाचे काम त्याच्या बरेच आधी पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले.

मार्गात बदलाची चाचपणीठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा या दोन मेट्रो प्रकल्पांच्या बाबतीत आरेखनांसंदर्भात (अलाइन्मेंट) तक्रारी आहेत. भिवंडी-कल्याण टप्प्यात अलाइन्मेंट बदलण्याची मागणी होत आहे; तसेच कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रोचा मार्ग शीळ-कल्याणमार्गे न नेता विरळ लोकवस्ती असलेल्या गावांमधून नेल्याच्याही तक्रारी आहेत. याची दखल घेत या दोन मार्गांची अलाइन्मेंट बदलण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ठाण्यातील तीनहात नाका येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची आखणी ठाणे महापालिकेने केली असून, यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी देण्याची घोषणाही शिंदे यांनी केली; तसेच कोपरी-पटणी खाडी पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले.‘फ्रीवे’चा मुलुंड-गायमुखपर्यंत विस्तारईस्टर्न फ्रीवे सध्या मानखुर्द येथे येऊन संपतो, परंतु त्यापुढे मुलुंड-ठाण्याच्या दिशेने मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा फ्रीवे मुलुंडपर्यंत व दक्षिणेला जीपीओपर्यंत वाढविण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. ठाण्यातून जाणारा महामार्ग; तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी साकेत-गायमुख कोस्टल रस्त्याचे नियोजन असून, हा रस्ता एमएमआरडीएने करावा आणि विस्तारित फ्रीवे या रस्त्याला जोडावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :विरार