मुंबईच्या विकासाची लढाई नक्कीच जिंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:13+5:302021-01-13T04:13:13+5:30

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना विरोधातील लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरू ...

We will definitely win the battle for the development of Mumbai | मुंबईच्या विकासाची लढाई नक्कीच जिंकू

मुंबईच्या विकासाची लढाई नक्कीच जिंकू

googlenewsNext

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विरोधातील लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरू झाली आहे. ही लढाई आपण नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला.

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दोन महाबोगद्यांचे काम ‘मावळा’ नावाच्या महाकाय टनेल बोअरिंग मशीनच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाचा आरंभ सोमवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सन २०१२-१३ च्या निवडणुकीत कोस्टल रोडचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळेस या प्रकल्पाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र आता या मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू असून, २० टक्के काम पूर्णही झाले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.

राज्यात १९९५ मध्ये युतीचे सरकार असताना मुंबईची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तब्बल ५५ उड्डाणपूल बांधण्यात आले. हे उड्डाणपूलही आता कमी पडू लागले आहेत. त्यामुळे कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसे या कामात ‘मावळा’ यंत्राचे काम असेल. त्याबरोबर रणांगणात मावळे लढत असतात. पालिकेच्या या कामात आयुक्तांपासून वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, काम करणारी कंपनी, अभियंते, कर्मचारी हे सगळेच असे मावळे आहेत. त्यामुळे पालिका वेळेआधीच हे काम पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

* सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईत

कोस्टल रोडमुळे उपनगरातील नागरिकांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट मुंबईत येता येणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. मुंबईकरांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा-सुविधा देण्यासाठी जगातून शक्य तितके सर्वोत्तम अत्याधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

* हे अजस्र यंत्र १२.१९ मीटर व्यासाचे आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे, तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्याचे काम मावळा करणार आहे.

* डायमंड कट्टरद्वारे मोठे खडक तोडण्याचे काम हा मावळा करणार आहे. खोदकाम केल्यानंतर तयार होणारी माती तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या मातीचा दर्जा चांगला असल्यास पुन्हा प्रकल्पामध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे खर्च वाचणार आहे.

* या मार्गावर रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग असणार आहे. तसेच ११ ठिकाणी कनेक्टिव्हिटी ठेवण्यात येणार आहे.

Web Title: We will definitely win the battle for the development of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.