मुंबई- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून त्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लडेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असं नवाब मलिक यांनी म्हटलं. नवाब मलिक यांना आता जे.जे. रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.