"मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार; ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा दबाव कामी"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 08:16 PM2022-06-01T20:16:36+5:302022-06-01T20:19:04+5:30
Ashish Shelar : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व्हाव्यात अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले.
मुंबई - ओबीसी आरक्षणा शिवाय मुंबई महापालिकेने वॉर्ड आरक्षणे जाहीर केली असली तरी ओबीसी आरक्षण मिळावेच असा रेटा भाजपाने ठेवल्याने आज पालिका आयुक्तांनी पुन्हा याबाबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा ओबीसींचा न्यायाचा लढा असून आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे मत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.
ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व्हाव्यात अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले. मात्र ठाकरे सरकार न्यायालयात अपयशी ठरल्यानंतर काल ओबीसी आरक्षण वगळून सोडती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर ही भाजपाने आरक्षण मिळालेच पाहिजे असा आग्रह धरला आहे. पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी कालच याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही पक्षातंर्गत ओबीसींना न्याय देऊ असेही पक्षाने जाहीर केले त्यामुळे सत्ताधारी पक्षावरील दबाव कायम ठेवण्यात भाजपाला यश आले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, ओबीसींना वगळून महापालिका आरक्षणे निघाली पण आम्ही ओबीसीसोबत आहोत. सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव सुरू असून काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. या लढाईत भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार! भ्रष्टाचाराला हरवणार! है तयार हम, असे जाहीर केले. भाजपाचा हा ओबीसींच्या बाजूने वाढता दबाव कामी आला आहे.
आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ओबीसी आरक्षणासह पुन्हा सोडत काढायची झाल्यास प्रशासनाने करायच्या उपाययोजनांबाबत बैठक घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करु तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.