प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं

By मुकेश चव्हाण | Published: November 25, 2020 10:47 AM2020-11-25T10:47:51+5:302020-11-25T11:02:38+5:30

ईडीने कारवाई का केली हे अद्याप आम्हालाच समजलेले नाही. माहिती घेऊन कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

We will fight a legal battle with information, said Shiv Sena MLA Pratap Saranaik | प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं

प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं

Next

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकून व्यावसायिक व्यवहारांबाबत त्यांचा मुलागा विहंग सरनाईक अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी ताब्यात घेऊन ६ तास चौकशी केली. त्यांनंतर आज पुन्हा विहंग आणि प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.

 राजकीय दबावतंत्रासाठी ईडीचा वापर करण्याचे दिल्लीतील भाजपा सरकारचे तंत्र आता सर्वाना समजले असून बळाचा कितीही वापर केला तरीही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. ईडीने जेव्हा छापा टाकला, त्यावेळी प्रताप सरनाईक परदेशात होते. त्यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर परदेशातून तात्काळ प्रभादेवी येथे शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयात जाऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. ईडीने कारवाई का केली हे अद्याप आम्हालाच समजलेले नाही. माहिती घेऊन कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत. प्रताप सरनाईकांनी गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगाना राणौत असो किंवा रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना टार्गेट केलं होतं. कंगना ड्रग्ज घेत असेल तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासोबतच रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने अर्णब गोस्वामीच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. त्यामुळेच अर्णब गोस्वामी यांना अटक झाली व त्या खटल्याचा तपास पुन्हा सुरू झाला. याचप्रमाणे अन्वय नाईक प्रकरण भाजपाने जाणिवपूर्वक दाबल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी भाजपावर केला होता. त्यातूनच प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची भावना शिवसेनेच्या गोटात आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद प्राप्त झाले. तीन टर्म आमदार होऊनही एकाच जिल्ह्यात किती मंत्रिपदे द्यायची, या निकषामुळे सरनाईक यांची संधी हुकली. मीरा-भाईंदर हा ठाणे जिल्ह्यातील भाजपाचा बालेकिल्ला होता. नरेंद्र मेहता यांच्यासारखे मातब्बर आमदार तेथे भाजपाचे प्रतिनिधित्व करीत होते. भाजपाच्या गीता जैन यांनी मेहता यांना मात दिली. अपक्ष विजयी झालेल्या जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करावा याकरिता प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले व त्यांना सेनेत आणून मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना मजबूत केली.

प्रताप सरनाईक यांचे हे आक्रमक होणे यामागे जिल्ह्यातील दोन मातब्बर मंत्र्यांच्या प्रभावात आपले राजकीय अस्तित्व भक्कम करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या प्रताप सरनाईक यांचे गेली काही वर्षे त्यांच्याशी राजकीय वैर निर्माण झाले होते. मात्र म्हाडाच्या वर्तकनगर येथील घरांच्या प्रकल्पाच्या निमित्ताने प्रताप सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी असलेले जुने वैर संपुष्टात आणले. यामुळे प्रताप सरनाईक यांची राजकीय घोडदौड गेल्या काही महिन्यांत चर्चेत होती.

चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे. 

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार; संजय राऊत आक्रमक

कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

ठाण्यातील नेत्यांची चुप्पी

प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत केंद्र सरकारचा समाचार घेतला. मात्र शिवसेनेचे सर्वोच्च नेते तसेच ठाण्यातील प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रताप सरनाईक यांची शिवसेना आता कशी पाठराखण करणार व कारवाई राजकीय हेतूने असल्यास त्यांना ती राजकारणात फलदायी ठरणार का, याची शिवसैनिकांत उत्सुकता आहे.

Web Title: We will fight a legal battle with information, said Shiv Sena MLA Pratap Saranaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.