विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेनेसोबतच लढविणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:43 AM2019-08-01T06:43:51+5:302019-08-01T06:43:57+5:30

मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार : अदलाबदलीसह १५ दिवसांत जागा वाटपाचा निर्णय

We will fight with the Shiv Sena in the assembly elections | विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेनेसोबतच लढविणार!

विधानसभा निवडणूक आम्ही शिवसेनेसोबतच लढविणार!

googlenewsNext

मुंबई : भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकाही युती म्हणूनच लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. येत्या काळात काही लोक शिवसेनेत येतील, काही भाजपमध्ये प्रवेश करतील. परंतु युतीच्या जागावाटपाचा विस्तृत आराखडा ठरलेला आहे. १५ दिवसांत जागा वाटप आणि जागांच्या अदलाबदलीबाबत चर्चा करून निर्णय घेतले जातील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बुधवारी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, नेते व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री म्हणाले, निवडणुकाजवळ आल्या आहेत, अन्य पक्षातून लोक येत असल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, आमची युती अभेद्य आहे. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो, विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवणार आहोत. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने तसे ठरवले आहे. आता बहुमताचे कोणते रेकॉर्ड आपण मोडतो हे बघायचे आहे. गुरूवारपासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू होत असून त्यादरम्यान जनादेश युतीच्या पाठिशी आणण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडीसह अन्य तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजप आमदारांना फोडत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, धमक्या देऊन कोणाला पक्षात घेण्याची आवश्यकता नाही. एक काळ असता होती की भाजप कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही
भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही, जिथे कोणीही उठावे आणि यावे. हा जनतेचा पक्ष आहे. जे चांगले काम करतात त्यांचे स्वागत आहे. येणाऱ्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच पक्षात प्रवेश दिला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच ही वाट दाखवली
देश ज्या बाजूला आहे, महाराष्ट्र ज्या बाजूला आहे, त्या बाजूला गेले पाहिजे, असा निर्णय कार्यकर्ते व तरूण नेत्यांनी घेतला. त्यामुळे भाजपमध्ये येण्याचा निर्णय आम्ही घेतला. राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच आम्हाला ही वाट दाखविली असे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी सांगितले.

भाजपमध्ये चार आमदारांसह महाभरती
मुंबईतील गरवारे क्लब येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. वैभव पिचड, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेस आ. कालिदास कोळंबकर, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील आणि महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांचे पक्षात स्वागत केले.

Web Title: We will fight with the Shiv Sena in the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.