शरजील उस्मानी बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंत भाजपने उस्मानीला अटक करण्याची मागणी केली. राज्याच्या गृहविभागाकडून शरजीलच्या विधानाची पडताळणी करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शरजील विरोधात गुन्हा दाखल होऊनही त्याला अद्याप अटक का केली जात नाही? असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरजील सध्या महाराष्ट्रात नसल्याची माहिती दिली. "पुण्यात ३० जानेवारीला एल्गार परिषदेत उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू", असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडं सोपवा, नितेश राणेंनी दिला दम
"आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है" असं वादग्रस्त वक्तव्य शरजील याने एल्गार परिषदेतील भाषणात केले होते. त्यानंतर, भाजपा नेते आक्रमक झाले. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरजील याला तात्काल अटक करा नाहीतर आंदोलन करू असा थेट इशाराच सरकारला दिला, तर नितेश राणे यांनी शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा, असा हल्लाबोल करत संताप व्यक्त केला होता.