लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:00 AM2021-02-03T07:00:25+5:302021-02-03T07:01:05+5:30
Mumbai Suburban Railway : सर्वसामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे.
मुंबई : सर्वसामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे. यावर, लोकांचे हित आणि गरज पाहून सोयीच्या वेळापत्रकासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
राजेश टोपे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना लोकलच्या वेळापत्रकाबाबत भाष्य केले. सर्वसामान्य प्रवाशांची सोय पाहूनच दळणवळणाबाबतचे निर्णय होणे अपेक्षित असते. लोकांचे हित आणि गरज पाहून लोकल सेवेचे वेळापत्रक बदलण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार नक्कीच त्याचा विचार करेल. लोकांचे हित, गरज आणि सोय पाहूनच सामान्यपणे असे निर्णय व्हायला हवेत. सध्याच्या वेळापत्रकात काही बदल करायचे असतील तर आरोग्य विभाग आणि राज्य सरकार निश्चित पाठपुरावा करेल, असे टोपे म्हणाले.
...म्हणून नाराजी
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देतानाच वेळेचे बंधन टाकण्यात आले. त्यानुसार पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी नियमित वेळेत पोहोचण्यासाठी किंवा तिथून परत घरी परतताना विनाकारण ताटकळत राहावे लागत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.