Maratha Reservation: 'आम्हीच तुमची वाट पाहत आहोत'; छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:40 PM2021-06-13T12:40:16+5:302021-06-13T12:58:54+5:30

आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू, असं संभाजीराजे यांनी सांगितले.

We will get reservation and solve other problems of the society, says MP Chhatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation: 'आम्हीच तुमची वाट पाहत आहोत'; छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आवाहन

Maratha Reservation: 'आम्हीच तुमची वाट पाहत आहोत'; छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आवाहन

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राजकारण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. "मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा," या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. "आमच्यामध्ये सामील व्हा," असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. 

नक्षलवाद्यांच्या या पत्रानंतर आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे नक्षलवाद्यांनो या, आम्हीच तुमची वाट पाहत आहोत, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे फेसबुकद्वारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. "नक्षलवाद्यांनो या, आम्हीच तुमची वाट पाहत आहोत, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असं आवाहन देखील संभाजीराजे यांनी केलं आहे. 

संभाजीराजे पुढे म्हणाले की, मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्यानंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज ह्या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत.

मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग  आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू, असं संभाजीराजे यांनी सांगितले.

कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाही बाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत-

"शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता, पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवाल, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत," असंही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटलं आहे. 

Web Title: We will get reservation and solve other problems of the society, says MP Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.