Join us

Video: 'धनुष्यबाण आम्हालाच'; सुषमा अंधारे अन् संदीपान भुमरेंचं कॉल रेकॉर्डींग व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 8:59 AM

दसरा मेळाव्यातील भाषणामुळे सुषमा अंधारे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

मुंबई - शिवसेनेच्या उपनेत्या आणि सध्या प्रबोधनकार यात्रेमुळे व भाषणांमुळे चर्चेत असलेल्या सुषमा अंधारे यांचा आणि शिंदे गटाचे नेते मंत्री संदीपान भुमरे यांच्यातील फोनकॉल संवाद व्हायरल झाला आहे. सुषमा अंधारे संदीपान भुमरेंना शिवसेनेची बाजू मांडताना भाजप आणि तपास यंत्रणांवर बोट ठेवत आहेत. तसेच, शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला सारुन आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करावं, असेही सूचवलं आहे. मात्र, आमचं मूळ बाळासाहेब ठाकरे हेच आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याच विचारांना घेऊन पुढे जात असल्याचं भुमरे बोलताना दिसून येत आहे. 

दसरा मेळाव्यातील भाषणामुळे सुषमा अंधारे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या महाप्रबोधन यात्रेतही त्या शिंदे गटासह भाजप नेत्यांवर शरसंधाण साधत आहेत. आपल्या मराठवाडा शैलीतील त्यांचं भाषण सध्या सोशल मीडियावरही चांगलंच बघितलं जात आहे. त्यामुळे, सुषमा अंधारेंना शिवसेनेकडूनही पाठबळ दिलं जात आहे. सुषमा अंधारे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात फोनद्वारे संवाद झाला. सध्या तो संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संवादात दोघांमध्येही शिवसेना आमचीच आणि धनुष्यबाणही आमचाच या मुद्द्यावरुन शाब्दीक वाद होताना दिसत आहे. भाजप, मोदी, शहा, फडणवीस आणि तपास यंत्रणांचा वापर होत असल्याने तुम्ही म्हणाल तसेच घडेल. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, असे सुषमा अंधारे संदीपान भुमरेंना सांगत आहेत. त्यासोबतच, ठाकरे हे नाव बाजुला करुन तुम्ही मैदानात उतरा, तुमचं राजकीय अस्तित्व निर्माण करा, असं आव्हानही त्यांनी दिल्याचं दिसून येत आहे. 

अंधारे यांच्या प्रश्नांवर भुमरेंनीही उत्तर दिलं आहे. मोदी, शहा आणि भाजप यांचा संबंध नाही. आम्ही युतीत निवडणूक लढलोय, म्हणून त्यांचं नाव घेणारच. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांचं काम करत आहेत. आम्ही आमदार, मंत्री हे केवळ बाळासाहेबांमुळेच झालो. त्यामुळे, आजही आम्ही त्यांच्या नावाने पुढे जात आहोत, असे भुमरे यांनी म्हटल्याचे या ऑडिओ रेकॉर्डींगमध्ये दिसून येते. तसेच, आम्हाला अजूनही विश्वास आहे, धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. कारण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे, असे संदीपान भुमरे यांनी म्हटलंय. त्यावर, सुषमा अंधारे यांनीही निश्चित तुम्हालाच मिळेल, कारण तुमच्याकडे सत्ताधारी भाजप आहे, केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी संदीपान भुमरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना विरुद्ध शिंदेगट या दोन्ही नेत्यांमधील फोनकॉलचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही नेते स्वत:ची बाजू मांडताना दिसून येतात.

टॅग्स :संदीपान भुमरेशिवसेनाउद्धव ठाकरेभाजपा