Join us

आम्ही जातो परत आमच्या खारच्या मूळ निवास्थानात, महापौरांचा पालिका प्रशासनाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:05 AM

दराडे दाम्पत्याच्या हट्टापायी, मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती रखडली

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर बंगला सोडण्याचा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की,  ''शिवसेनाप्रमुख हे आपल्यासाठी दैवत असून त्यांच्या स्मारकासाठी मी कधीही महापौर बंगला सोडण्यास तयार आहे. पर्यायी महापौर निवास्थानासाठी मलबार हिल जलाशय बंगल्याला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र सध्याचे एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे हे पालिका निवासस्थान सोडण्यास तयार नाही. त्यामुळे मी शिवाजी पार्क येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी रिकामा करत असून खार (पूर्व) गोळीबार येथील माझ्या मूळ निवासस्थानी जाईन, असा इशारा आपण पालिका आयुक्त अजोय मेहता यांना देत असल्याची माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

पल्लवी दराडे आणि प्रवीण दराडे यांच्या हट्टापायी पालिकेच्या मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती रखडली आहे. दराडे यांच्यावर कोणाचा मोठा वरदहस्त आहे की पालिका निवासस्थान खालीच करत नाही, असा सवाल महापौरांनी केला. या जलाशयाच्या वर असलेला पालिकेचा बंगला रिकामा करण्यास दराडे दाम्पत्य तयार नसल्यामुळे ही दुरुस्ती करता येत नसल्याची कबुली प्रशासनानेच दिली आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात होणार आहे. मात्र महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महापौर निवासस्थानासाठी शिवसेनेनं मलबार हिल येथील पाणी खात्याच्या बंगल्याचा पर्याय सुचवला होता. मात्र माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे या सध्या त्या बंगल्यात राहत असून त्या बंगला सोडण्याचे नावच घेत नाहीत. याबाबत शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विधी समितीमध्ये जून महिन्यात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रशासनाच्या या बेजबाबदार उत्तराला शीतल म्हात्रे यांनी काल पालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत काल जोरदार आक्षेप घेतला. प्रशासनाच्या चालढकल कारभाराचा निषेध करीत म्हात्रे यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षा सुवर्णा कारंजे यांनी काल सभा तहकूब केली.

सर्वसामान्य व्यक्तीने पालिकेची जागा अशी अडवली असती तर प्रशासनाने त्यांना सर्व शक्तिनिशी हुसकावून लावले असते. मग दराडे दाम्पत्यांना वेगळा न्याय का, असा खडा सवाल म्हात्रे यांनी या वेळी केला. कायदेशीर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाला इतके महिने का लागतात असाही सवाल त्यांनी केला.

मलबार हिल जलाशय हे सन 1881 पासून वापरात असून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने दराडे यांना बंगला रिकामा करण्यासाठी नोटीस मे महिन्यात बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी त्यास नकार दिला व पुन्हा नोटीस पाठवू नये, असे पालिकेलाच दराडे यांनी  11 ऑक्टोंबर 2017 च्या पत्रानुसार बजावले आहे. त्यामुळे दराडे यांच्यावर आपल्या 28 मे  2018 च्या पत्रानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी उत्तर जल अभियंता विभागाने दिले आहे. मात्र अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही? बंगला का रिकामा करण्यात आला नाही असा सवाल नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शेवटी केला.

प्रवीण दराडे

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई