...तर दामोदर हॉलसाठी उपोषणाला बसू - प्रशांत दामले

By संजय घावरे | Published: May 15, 2024 07:38 PM2024-05-15T19:38:14+5:302024-05-15T19:38:42+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कसली कंबर; रंगकर्मींसह लोककलावंतानी सरकारला दिला ईशारा

we will go on a fast for Damodar Hall says Prashant Damle | ...तर दामोदर हॉलसाठी उपोषणाला बसू - प्रशांत दामले

...तर दामोदर हॉलसाठी उपोषणाला बसू - प्रशांत दामले

मुंबई - परळ येथील दामोदर हॉल, सहकारी मनोरंजन मंडळ आणि सोशल सर्व्हिस लीगच्या लढाईत आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही उडी घेतली आहे. २८ मे पर्यंत योग्य पाऊल उचलले नाही तर दामोदर हॅालसाठी उपोषणाला बसणार असल्याचा ईशारा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

सोशल सर्व्हिस लीग संस्थेच्या जागेवर असलेल्या दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे प्रकरण नोव्हेंबर २०२३ पासून ऐरणीवर आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि प्रवीण दरेकर यांनी भेट दिल्यानंतर दामोदर हॉलच्या पडकामाला स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती असतानाही सोशल सर्व्हिस लीगने पुन्हा पाडकाम सुरू केल्याचा आरोप करत सहकारी मनोरंजन मंडळाने मराठी रंगभूमीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे दाद मागितली. यावर नाट्य परिषदेने पत्रकार परिषदेचे बोलावत आपले म्हणणे मांडले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामलेंसह बाल रंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, बाल रंगभूमीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, परिषदेचे प्रवक्ते अजित भुरे, सहकारी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, मंडळाचे सचिव के. राघवकुमार, ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते, निर्माते दिलीप जाधव, अभिनेत्री-लावणी नृत्यांगना मेघा घाडगे, सहकारी मनोरंजन मंडळाचे पदाधिकारी आदी मंडळी उपस्थित होती. 

प्रशांत दामले म्हणाले की, दामोदर हॉलच्या बाबतीत ज्या गोष्टी सामोपचाराने व्हाव्या असे वाटत होते त्या झाल्या नसल्याने ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. मूळात दामोदर हॉल हे नाट्यगृह पुन्हा उभे राहील की नाही? याबाबतच साशंक असल्याने नाट्य परिषदेचे विश्वस्त मंत्री उदय सामंत यांना आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून देण्याची विनंती केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्यांची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी एकदाच चर्चा करून हा विषय संपवावा. दामोदर हॉलमधील कर्मचाऱ्यांना संस्थेच्या इतर कामांमध्ये सामावून घेणे गरजेचे आहे. यासाठी सोशल सर्व्हिस लीग, दामोदर हॉलचे व्यवस्थापन, सहकारी मनोरंजन मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची एकत्र बैठक घेण्यात यावी. त्यातूनही तोडगा निघाला नाही तर मी सर्व कलाकारांना घेऊन उपोषणाला बसेन असा शब्द नाट्य परिषदेतर्फे देत असल्याचे म्हणत दामले यांनी सरकारला थेट ईशारा दिला आहे. 

यासाठी दामलेंनी सरकारला २८ मेपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर रंगकर्मींतर्फे उपोषणाचे हत्यार उपसले जाईल. नीलम शिर्के-सामंत यांनी दामलेंच्या वक्तव्याला दुजोरा देत अगोदर शाळा बांधून झाल्यास दामोदर हॉल पुन्हा उभा राहिल याची खात्री वाटत नसल्याचे म्हटले. दामोदर हॉलच्या या लढ्यात लोककलावंतही सामील होतील अशी ग्वाही मेघा घाडगेने दिली. 
 
इतर मागण्या -
शाळा आणि नाट्यगृहाचे बांधकाम एकाच वेळी सुरू करून पूर्ण करण्याचे लेखी स्वरूपात द्यावे.
७५० आसनक्षमतेचे नाट्यगृह उभारले जावे.
पूर्वीच्या कार्यालयांना तेवढ्याच क्षेत्रफळाची जागा नवीन वास्तूत मिळावी.
नाट्यगृहासाठी मिळालेला वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरावा.
कर्मचाऱ्यांना पर्यायी रोजगार देऊन नंतर नाट्यगृहाच्या सेवेत सामील करावे.
नवीन वास्तू तयार होईपर्यंत मंडळाच्या कार्यालयासाठी पर्यायी जागा द्यावी.
शाळा व नाट्यगृहाचे प्रवेशद्वार वेगवेगळे असावे.
नाट्यगृह तळमजल्यावर बांधावे व भाडे मर्यादित ठेवावे.

Web Title: we will go on a fast for Damodar Hall says Prashant Damle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई